ब्रँडेड ज्वेलरी उद्योगात बिर्ला समूहाची उडी; टाटांच्या टायटन, अंबानींच्या रिलायन्सला देणार टक्कर!
भारतातील दागिने विक्रीचा व्यवसाय गेल्या काही काळात चांगलाच विस्तारला आहे. अशातच या क्षेत्रात मोठी स्पर्धा तयार होण्याचे संकेत मिळत आहे. सोने विक्री व्यवसायात टाटा आणि अंबानी हे समूह आधीपासूनच कार्यरत आहे. मात्र, आता आदित्य बिर्ला समूह देखील ब्रँडेड रिटेल ज्वेलरी अर्थात दागिने विक्री व्यवसायात उतरला आहे. त्यामुळे आता यापुढे टाटा, अंबानी या समूहांसोबत दागिने व्यवसायात आदित्य बिर्ला समूह देखील स्पर्धा करणार आहे.
‘इंद्रिया’ या ब्रँड नावाने होणार दागिने विक्री
कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील आदित्य बिर्ला समूह कार्यरत आहे. समूहाने नुकताच आपला ‘इंद्रिया’ ब्रँड लॉन्च केला आहे. सध्याच्या घडीला कंपनीने देशात दिल्ली, जयपूर आणि इंदौर या तीन प्रमुख शहरांमध्ये आपले ज्वेलरी स्टोर सुरु केले आहेत. आदित्य बिर्ला समूह सध्या टेलिकॉम, कापड व्यवसाय, सिमेंट व्यवसायामध्ये कार्यरत आहे. याशिवाय कंपनी आर्थिक सेवा आणि फॅशन या क्षेत्रात देखील कार्यरत आहे.
सहा महिन्यात ११ स्टोर उभारणार
भारतातील दागिन्यांची बाजारपेठ सुमारे ६.७ लाख कोटी रुपयांची आहे. बिर्ला या नामांकित समूहाने दागिन्यांच्या बाजारात उडी घेतली आहे. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, सध्या 3 शहरांमध्ये चार रिटेल स्टोअर्स उघडण्यात आली आहेत. येत्या 6 महिन्यांत 11 शहरांमध्ये इंद्रिया ज्वेलरी ब्रँडचे स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. इतकेच नाही तर कंपनीने दर 45 दिवसांनी 5000 खास डिझाईन्ससह एक नवीन डिझाईन लॉन्च करण्याबाबत म्हटले आहे.
5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले आहे की, “यावर्षी कंपनीने थेट ग्राहक व्यवसायाशी संबंधित दोन मोठ्या ब्रँडची घोषणा केली आहे. पहिला ब्रँड पेंट सेगमेंटमधला Opus आणि दुसरा ब्रँड ज्वेलरी सेगमेंटमध्ये इंद्रिया हा आहे. कंपनीचा भारतात थेट ग्राहक व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या, समूहाचा 20 टक्के व्यवसाय ग्राहक व्यवसायातून येतो.” आदित्य बिर्ला समूहाने ब्रँडेड दागिने व्यवसायासाठी एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. ज्यास कादंबरी ज्वेलर्स असे नाव देण्यात आले आहे. समूहाने दागिन्यांच्या व्यवसायासाठी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे.