
Ananya Agarwal's Cafe: (सौजन्य- सोशलमीडिया)
कॉलेजचे असाइनमेंट, परीक्षा आणि नोकरीची टेन्शन यातच बहुतेक तरुण या वयात अडकलेले असतात. पण गुरुग्राममधली अनन्या अग्रवाल हिने वयाच्या 21 व्या वर्षीच स्वतःचा धंदा उभा करून दाखवला. BMS च्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या अनन्याने द्वारका एक्स्प्रेसवेवर ‘ल्यूम अँड लाइम’ (Lume & Lime) हे कॅफे सुरू केलं. सुरुवातीच्या अवघ्या अडीच महिन्यांतच या कॅफेने जवळपास 22 लाख रुपयांची कमाई केली आहे.
कॅफेच्या खालच्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एकाच वेळी 75 ते 80 जणांना बसता येतं. तळघरात लाईव्ह म्युझिक, ओपन माइक, कविता वाचन आणि वाढदिवसाच्या पार्ट्यांसाठी खास जागा तयार केली. पहिल्या 50 दिवसांतच कॅफेने 15 लाख रुपयांचा धंदा केला होता. नोव्हेंबर 2026 पर्यंत हा आकडा 22 लाख रुपयांवर पोहोचला. आतापर्यंत जवळपास 2,000 ग्राहकांनी इथे भेट दिली असून, दोन जणांच्या जेवणाचा सरासरी खर्च 1,500 ते 1,800 रुपयांच्या मध्ये येतो.
कॅफेच्या ऑनलाईन मेन्यूनुसार स्पेशल कॉफी आणि इतर पेयांचे दर साधारण 215 ते 355 रुपयांच्या मध्ये आहेत. पिझ्झाची किंमत 695 ते 915 रुपयांपर्यंत आहे. कॅफे सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत चालू असतं. इथे 30 ते 35 कर्मचारी काम करतात, त्यातले 10 ते 12 जण किचनमध्ये आहेत. तळघरात आर्ट वर्कशॉप आणि खासगी कार्यक्रम पण होतात, त्यासाठी स्टेज, मायक्रोफोन आणि म्युझिक सिस्टीमची सोय केली आहे.
4,200 चौरस फुटांवर पसरलेलं हे तीन मजली कॅफे उभं करायला जवळपास चार महिने लागले. कॉलेज, इंटर्नशिप आणि कॅफेचं काम एकाचवेळी सांभाळणं हे अनन्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं. बांधकामाची देखरेख तिच्या आई-वडिलांनी केली, तर अनन्या कॉलेजच्या मधल्या वेळेत गूगल मीटवरून रोज अपडेट घेत राहिली. आजही हजेरी आणि परीक्षा सांभाळत ती CEO आणि सहसंस्थापक म्हणून कॅफेची जबाबदारी पार पाडते.
गुरुग्रामच्या सेक्टर-113 मधल्या M3M SCO मार्केटमध्ये असलेलं हे कॅफे पूर्णपणे शाकाहारी आहे. भारतात इटालियन किंवा मेक्सिकन पदार्थात भारतीय मसाले टाकून मूळ चव बदलली जाते, असं अनन्याचं मत आहे. म्हणूनच इथे इटालियन, मेक्सिकन आणि मेडिटेरेनियन पदार्थ त्यांच्या मूळ रूपात दिले जातात. नेपोलिटन पिझ्झा इथेच बनतो, पास्ता आणि रॅविओली हाताने बनवली जातात, आणि टॅकोजसाठी खास पीठ मेक्सिकोतून मागवलं जातं.
मूळची बिहारची असलेल्या अनन्याचं कुटुंब गुरुग्राममध्ये राहतं. ती नोएडातल्या शिव नादर विद्यापीठात व्यवस्थापनाचं शिक्षण घेते. लहानपणापासून वेगवेगळे पदार्थ चाखण्याचा आणि नवनवीन कॅफे शोधण्याचा तिला छंद होता. वडील डॉ. विशाल अग्रवाल यांच्या धंद्याच्या अनुभवातून प्रेरणा घेत, कॉलेजच्या पहिल्या वर्षीच काहीतरी स्वतःचं सुरू करायचं तिने ठरवलं होतं. जानेवारी 2026 मध्ये तिने या कल्पनेवर काम सुरू केलं. लोकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आई-वडिलांना तिने या धंद्यासाठी तयार केलं 28 ऑगस्ट 2026 रोजी कॅफे सुरू झालं.
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या शहरात कॉलेजमधल्या तरुण उद्योजकांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळतयं. अनन्याच्या गोष्टीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते: वेगळी कल्पना, घरच्यांचा पाठिंबा आणि जबाबदाऱ्यांचं नीट वाटप असेल तर शिक्षण आणि धंदा एकत्र चालवणं शक्य आहे. पण कॅफेसारख्या धंद्यात जागेचं भाडं, कर्मचाऱ्यांचा खर्च आणि सुरुवातीची गुंतवणूक मोठी असते. त्यामुळे आपल्या शहरातली परिस्थिती बघूनच पावलं टाकणं योग्य ठरेल.
Ans: अनन्या अग्रवाल ही गुरुग्राममधील २१ वर्षीय तरुण उद्योजिका असून ती BMS च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
Ans: अनन्याने 'ल्यूम अँड लाइम' (Lume & Lime) नावाचे शाकाहारी कॅफे सुरू केले.
Ans: या कॅफेने अवघ्या अडीच महिन्यांत जवळपास २२ लाख रुपयांचा व्यवसाय केला.