अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने FDA कडक पाऊल उचलले आहे
महाराष्ट्र एफडीएने ८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणची तपासणी केली. तपासणीदरम्यान, अनेक ठिकाणी स्वच्छता, अन्न हाताळणी, तापमान नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट परवाने रद्द करण्यात आले आहेत.
रेल्वे प्रवाशांना जेवण देणारी IRCTC ची बेस किचन्स आणि फूड प्लाझादेखील FDA च्या रडारवर आहे. एकूण पाच ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यापैकी, कुर्ला पश्चिम येथील आर. के. असोसिएट्स अँड हॉटेलियर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला, तर चार आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तपासणीदरम्यान, कुर्ला येथील बेस किचनमध्ये झुरळांचा वावर, उघड्यावर अन्न साठवणे, उघड्या कचऱ्याजवळ अन्न तयार करणे आणि स्वयंपाकघराची दयनीय अवस्था यांसारखा धक्कादायक प्रकार आढळून आला. याचा अर्थ असा की, ज्या ठिकाणी अन्न तयार केले जाते आणि प्रवाशांना दिले जाते, त्याच ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नव्हतं. त्यामुळे मोठा धोका दाखवत थेट कारवाई करण्यात आली.
FDA ला मालाड पश्चिम येथील Drogheria Sellers Pvt. Ltd. Zepto च्या आवारात गंभीर त्रुटी आढळून आल्या. तपासणीत मोठ्या संख्येने झुरळे, सदोष कोल्ड चेन, अस्वच्छ गटार आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेतील त्रुटी उघड झाल्या.
सर्वात मोठी तफावत नाशवंत खाद्यपदार्थांच्या तापमानाबाबत आढळून आली. दूध, चीज आणि दही यांसारखे पदार्थ १४-१५ अंश सेल्सिअस तापमानात साठवले जात होते, तर ते २ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे आवश्यक असते. यानंतर, FDA ने तात्काळ झेप्टोच्या आवाराचा परवाना निलंबित केला. विक्री, साठवणूक, वितरण आणि ऑनलाइन ऑर्डरची पूर्तता यावरही बंदी घालण्यात आली.
खारघर येथील मातेश्वरी मिल्कला देखील दणका बसला आहे. यामध्ये देखील बरेच त्रुटी जाणवत आहेत. दुधाच्या तापमानावर नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी यासंबंधीच्या नियमांचे पालन केले जात नव्हते.
FDA च्या मते, ग्राहकांना दिलेल्या तपशिलात आणि दुधाच्या टाक्यांवरील माहितीत तफावत आढळून आली. इतकेच नव्हे तर, पाश्चरायझेशनची सुविधा नसतानाही पाश्चराइज्ड दुधाचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले. ७ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली, ज्यानंतर परवाना निलंबित करण्यात आला.
इस्कॉन जुहू कॅम्पसमधील तीन फुड युनिट्सदेखील FDA च्या कारवाईतून सुटले नाहीत. पाण्याच्या नियमित गुणवत्ता तपासणीच्या नोंदी गहाळ असल्याचे आढळले. त्याचबरोबर कच्चे आणि तयार अन्न अयोग्यरित्या साठवलेले आढळले आहे. तपासणीत कीटकांचा प्रादुर्भाव, स्वच्छतेतील हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणासंबंधी नोंदींचा अभाव असल्याचेही उघड झाले. या त्रुटींनंतर, तिन्ही अन्न युनिट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.
FDA ने पुणे विभागातील अन्न सुरक्षेबाबतही कारवाई केली. एकूण १२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी, ‘आदिती व्हेज’ वैध अन्न परवान्याशिवाय कार्यरत असल्याचे आढळल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, काका वडा पाव, क्रिस्टल गोरमेट, गुरुकृपा चिकन प्लांट, हॉटेल यशराज, श्री गणेश हॉटेल, हॉटेल सह्याद्री, सावनगिरी लोणी डोसा, गोल्डन चाहा, जॅक्सन डेअरी आणि खडा वडा पाव सेंटर यांसह ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
FDA ने स्पष्ट केले आहे की, अन्न व्यवसायात गुंतलेल्या सर्व आस्थापनांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केल्यास कारवाई केली जाईल. हॉटेल असो, डेअरी असो, ऑनलाइन डिलिव्हरी वेअरहाऊस असो किंवा रेल्वे बेस किचन असो, अन्न सुरक्षेतील निष्काळजीपणा आता महागात पडू शकतो. एफडीएने संकेत दिले आहेत की, येत्या काही दिवसांत अशा आस्थापनांची तपासणी आणि कारवाई सुरू राहील.






