...'या' आहेत देशातील पाच दिग्गज महिला उद्योगपती; कोट्यवधींची आहे संपत्ती!
देशात आज असे कोणतेच क्षेत्र नाहीये. ज्यात महिलांची आपली ओळख निर्माण केलेली नाही. महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला स्वतःला सिद्ध करत आहेत. देशातील उद्योग क्षेत्र हे काही घराण्यांपुरतेच मर्यादित आहे. त्याच्यातही देशातील उद्योग क्षेत्रावर पुरुष सत्तेचा पगडा आहे. मात्र, असे असताना आज देशातील काही महिला या समर्थपणे उद्योग विश्वाची कमान सांभाळत आहेत. आज आपण देशातील प्रमुख पाच महिलांबाबत जाणून घेणार आहोत… ज्या देशातील आघाडीच्या कंपन्यांचा कारभार सांभाळत आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा अग्रस्थानी
आपण ज्या पाच महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. त्या मोठ्या उद्योगपती घराण्यांमधून आहेत. त्यांनी आपल्या कामातून देशातील उद्योग विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योग विश्वातील महिलांच्या कामाबाबतच्या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी व्यावसायिक जगतात यशाची नवी कहाणी लिहिली आहे. बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुनच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 4.30 लाख कोटी रुपये आहे.
हेही वाचा : ‘या’ नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; मिळालंय 17 हजार कोटींहून अधिकचे काम!
निसाबा गोदरेज दुसऱ्या क्रमांकावर
या यादीत निसाबा गोदरेज यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या एमडी आणि चेअरपर्सन आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.72 लाख कोटी रुपये आहे. मंजू डी गुप्ता या लुपिन लिमिटेडच्या गैर-कार्यकारी अध्यक्षा आहेत. 2017 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून त्या व्यावसायिक जगतात कार्यरत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 71,200 कोटी रुपये इतकी आहे.
देवी सिंघानिया, मेहर पुदुमजी
याशिवाय या यादीत सुशीला देवी सिंघानिया यांचेही नाव आहे. त्या जेके सिमेंटच्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 65,000 कोटींहून अधिक आहे. हा व्यवसाय सिंघानिया कुटुंब चालवत आहे. देशातील दिग्गज उद्योगपतींच्या यादीत आगा घराण्यातील मेहर पुदुमजी यांचेही नाव आहे. त्या थरमॅक्स समूहाच्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 44,000 कोटी रुपये इतकी आहे.