केवळ नदी प्रवाहीत ठेवल्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न निकाली निघणार नसून या प्रदुषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच पंचगंगेत मिसळणारे रसायनयुक्त, मैलायुक्त सांडपाणी थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोना काळात कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोली एमआयडीसी या भागातील सर्व प्रोसेस, कारखाने बंद असल्याने पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी मिसळत नव्हते. त्यामुळे काही महिने पंचगंगा नदीला स्वच्छ पाणी होते. त्यानंतर कोरोना संपल्यानंतर सर्व उद्योग सुरू झाल्यामुळे या उद्योगांचे रसायनयुक्त व मैला मिश्रित पाणी नदीत सोडले जात असल्यामुळे पंचगंगा पुन्हा प्रदुषित होत असल्याचे दिसून येते.
प्रदुषित पाण्यामुळे परिसरातील पिके व मानवी जीवन धोक्यात आल्याचे स्पष्ट
नदीने तळ गाठल्याने पाण्याअभावी ऊस व भाजीपाला, कोबी, टोमॅटो, दोडका, फ्लावर, उडीद, मूग ही पिके धोक्यात आली होती. शासनाने आता पंचगंगा नदी थोड्या प्रमाणात प्रवाहित केल्यामुळे शेतकरी वर्गांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र दुषित पाण्यातच हे पाणी मिसळले जात असल्यामुळे पुन्हा दुषित पाणीच नागरिकांच्या वाट्याला येत आहे. त्यामुळे नदी प्रवाहीत करण्याबरोबरच प्रदुषणकारी घटकांवरही कारवाईची मागणी होत आहे.
प्रदूषणाचा मनुष्यासह जलचर प्राण्यांनाही मोठा धोका
या नदी प्रदुषणाचा मनुष्यासह जलचर प्राण्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. कायमच प्रदूषित राहिली आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठत आहे त्यामुळे नदीतील जलचर यांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जलचरांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, गेली चार दिवस पंचगंगा नदीने तळ गाठला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरले होते. तर काही गावांचा पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.






