फोटो सौजन्य - Social Media
भारतातील जलद वाणिज्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्स्टामार्टने गौतम स्वरूप यांची मुख्य व्यवसाय अधिकारी (सीबीओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ग्राहककेंद्री वाढ, उत्पादन श्रेणीचा विस्तार, श्रेणी व्यवस्थापन आणि ब्रँड भागीदारी मजबूत करण्याची जबाबदारी ते सांभाळणार आहेत. या नियुक्तीमुळे इन्स्टामार्टच्या व्यावसायिक विस्ताराला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गौतम स्वरूप यांना सल्लागार, औषधनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात मॅकिन्से अँड कंपनीमधून केली. त्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये उदयोन्मुख बाजारपेठांतील व्यवसायात उल्लेखनीय वाढ घडवून आणली. तसेच ओयोच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमेरिका, ब्रिटन, युरोप, चीन आणि लॅटिन अमेरिका येथील व्यवसाय नफ्यात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्विगीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी गिरीश मेनन यांनी सांगितले की, उत्पादन श्रेणीतील वैविध्य वाढवण्याच्या आणि ब्रँड भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या टप्प्यावर गौतम यांचे नेतृत्व कंपनीसाठी महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे ग्राहकांना अधिक चांगला आणि सोयीस्कर अनुभव देण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना गौतम स्वरूप म्हणाले की, इन्स्टामार्टच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर संघात सामील होताना आनंद होत असून, ग्राहक आणि भागीदारांसाठी अधिक मूल्य निर्माण करत व्यवसायाच्या शाश्वत विस्तारासाठी काम करण्यास ते उत्सुक आहेत.
गौतम स्वरूप यांची नियुक्ती ही इन्स्टामार्टच्या नेतृत्व चमूला अधिक बळकट करण्याच्या धोरणाचा भाग आहे. याआधीही कंपनीने जाहिरात महसूलीकरण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकर आडवी आणि एफएमसीजी श्रेणी विभागाच्या सहाय्यक उपाध्यक्ष हरदीप कौर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नेतृत्व संघात समावेश केला आहे.






