आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध
मुंबई: घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने आरोग्य सेवेसाठी वैद्य एआय चॅटबॉटची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील सर्व सेवा एकमेकांशी संलग्न करण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये आरोग्य पायाभूत सुविधेच्या तपशिलाचाही समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फॅक्टल ॲनॅलिटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून आरोग्य क्षेत्रासाठीची समर्पित अशी वैद्य एआय (Vaidya AI) या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा ९८९२९९३३६८ या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान स्नेही पुढाकार घेत एक महत्त्वाचा सामंजस्य करार बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फॅक्टल ॲनॅलिटिक्स लिमिटेड या संस्था दरम्यान करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे तसेच फॅक्टल नॅलिटिक्स लिमिटेडचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला होता.
श्रीकांत वेलमकन्नी, सह-संस्थापक,ग्रुप सीईओ-व्हाइस चेअरमन, फ्रॅक्टल यांनी सांगितले,”तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक आरोग्यसेवेप्रती असलेली बीएमसीची (BMC) कटिबद्धता आणि जबाबदार एआय (Responsible AI) क्षेत्रातील फ्रॅक्टलचा (Fractal) अनुभव यांचा संगम या सहयोगातून साधला गेला आहे. आरोग्यविषयक माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यापलीकडे जाऊन, हा उपक्रम हे देखील दर्शवतो की, प्रत्यक्ष परिणाम साधणाऱ्या व्यावहारिक आणि विस्तारक्षम उपायांद्वारे एआय (AI) कशा प्रकारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य प्रशासकांना सहाय्य करू शकते,’’
नागरिकांची वैद्यकीय उपचारांची माहिती ही चॅटबॉट च्या माहितीचा मुख्य स्त्रोत असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अधिकाधिक सक्षम पायाभूत आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी हा दुवा महत्वाचा ठरणार आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील आरोग्य संस्थांच्या सेवांचा तसेच योजनांचा लाभ चॅटबॉटच्या सुविधेच्या माध्यमातून घेता येईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी व्यक्त केला.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी संलग्न अशा योजनांची माहितीदेखील व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. नागरिकांना या सुविधेचा फायदा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी होईल. त्यासाठी नागरिकांना या सुविधेच्या निमित्ताने अभिप्राय सादर करण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेत मोठे बदल होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर वापर – कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या पुढाकाराच्या माध्यमातून नागरिकांसोबतचा संवाद वाढवणे, प्राथमिक टप्प्यातील उपचारासाठीची मदत उपलब्ध करून देणे, बहुभाषिक नागरिकांसोबतचा संवाद करणे आणि रुग्णालय प्रशासनाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर या प्लॅटफॉर्मचा वापर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेसाठी समर्पित व्यासपीठ – महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे दैनंदिन कामकाज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभव्हावे, यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित वैद्य एआय (Vaidya AI) हे आरोग्य क्षेत्रासाठीचे समर्पित असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Ans: ‘वैद्य’ हा नागरिकांना आरोग्यविषयक प्राथमिक माहिती मिळवून देण्यासाठी विकसित करण्यात आलेला AI आधारित चॅटबॉट आहे. याच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.
Ans: नागरिकांना आरोग्यविषयक प्राथमिक माहिती तसेच त्यांच्या घराजवळ उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची आणि उपचार सुविधांची माहिती मिळू शकते.
Ans: चॅटबॉटमध्ये आवश्यक माहिती किंवा प्रश्न विचारल्यानंतर संबंधित परिसरातील उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.