2024-25 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहणार; आयएमएफचा सुधारित अंदाज जारी!
2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढू शकते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक वाढीचा अंदाज जारी केला आहे. आयएमएफच्या मते, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी हा 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यातपासून आयएमएफने आपल्या अंदाजात भारताचा आर्थिक विकास दर हा ७ टक्के राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एप्रिल 2024 मध्ये आयएमएफने जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा हा अंदाज 0.2 टक्के अधिक आहे.
जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्के दराने वाढणार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या सुधारित अंदाजात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.2 टक्क्यांच्या तुलनेत 2024-25 मध्ये भारतातील जीडीपी वाढ 7 टक्के असेल, तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जीडीपी वाढ ही 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. असेही आयएमएफने आपल्या अंदाजात म्हटले आहे. आयएमएफच्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात दिसलेली अल्प मागणी आता संपुष्टात आली आहे आणि अर्थव्यवस्था आता आपल्या क्षमतेनुसार वाढ दर्शवत आहे. दरम्यान, 2024 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्के दराने वाढ दर्शवेल. असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
IMF Growth Forecast: 2024
🇺🇸US: 2.8%
🇩🇪Germany: 0.0%
🇫🇷France: 1.1%
🇮🇹Italy: 0.7%
🇪🇸Spain: 2.9%
🇬🇧UK: 1.1%
🇯🇵Japan: 0.3%
🇨🇦Canada: 1.3%
🇨🇳China: 4.8%
🇮🇳India: 7.0%
🇷🇺Russia: 3.6%
🇧🇷Brazil: 3.0%
🇲🇽 Mexico: 1.5%
🇸🇦KSA: 1.5%
🇳🇬Nigeria: 2.9%
🇿🇦RSA: 1.1%https://t.co/sDv9tK6YQb pic.twitter.com/epCi3VT13o— IMF (@IMFNews) October 22, 2024
महागाई दर 5.8 टक्के राहणार
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने ७ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे. तर महागाईचा विचार करता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर महागाई कमी होईल. 2023 मध्ये 6.7 टक्क्यांच्या तुलनेत 2024 मध्ये महागाई दर 5.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
जागतिक तणावामुळे व्याजदरात कपातीस विलंब
भारतासाठीच्या आपल्या अंदाजात, आयएमएफने म्हटले आहे की, भारतातील चलनवाढीचा दर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 4.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 4.1 टक्के असेल. तर वस्तूंच्या किमती आता स्थिर होत आहेत. परंतु, सेवा क्षेत्रातील वस्तूंच्या किंमतींची चलनवाढ अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये उच्च आहे. असेही आयएमएफने म्हटले आहे. इतकेच नाही तर जागतिक तणावामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात कपात करण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे वित्तीय धोरण आणि आर्थिक स्थिरतेला धक्का बसू शकतो. असेही आयएमएफने म्हटले आहे.