जेएसडब्लू समुहाला मोठा झटका, सेबीकडून जेएसडब्लू सिमेंटचा 4000 कोटींच्या आयपीओचा प्रस्ताव बासनात!
अलिकडेच प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्लू समुहाने आपल्या जेएसडब्लू सिमेंट कंपनीचा 4000 कोटींचा आयपीओ लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी आयपीओशी संबंधित कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर केली होती. ज्यामुळे आता लवकरच जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होईल. असे समोर आले होते. मात्र, आता सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू समुहाला मोठा झटका बसला आहे. शेअर बाजार नियामक (सेबी) ने जेएसडब्लू सिमेंट कंपनीचा 4000 कोटी रुपयांचा आयपीओ होल्डवर ठेवला आहे.
काय म्हटलंय सेबीने याबाबत
दरम्यान, जेएसडब्लू सिमेंटच्या आयपीओला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवण्याबाबत सेबीकडून कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही. सेबीने केवळ इतकेच म्हटले आहे की, जेएसडब्लू सिमेंटच्या मसुदा प्रस्ताव दस्तऐवजावरील मत पुढे ढकलण्यात आले आहे.
१६ ऑगस्टला कागदपत्रे केली होती सादर
जेएसडब्लू सिमेंट या जेएसडब्लू समुहाच्या कंपनीने आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून आणि विक्रीसाठी ऑफर या दोन्ही माध्यमातून निधी उभारण्याची तयारी केली होती. १६ ऑगस्ट रोजी कंपनीने आयपीओला मंजुरी मिळवण्यासाठी नियामकाकडे मसुदा कागदपत्रे सादर केली होती. आयपीओमध्ये जमा झालेल्या पैशातून कंपनी राजस्थानमधील नागौर येथे उभारल्या जाणाऱ्या सिमेंट युनिटमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी करत होती. तसेच, आयपीओद्वारे उभारलेल्या रकमेतून कर्जाची परतफेड करण्याचे लक्ष्य होते. याशिवाय काही रक्कम ही सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी देखील वापरायची होती.
विस्तार करण्यासाठी कंपनीची योजना
जेएसडब्लू सिमेंटने 60 दशलक्ष टन उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे, यासाठी जेएसडब्लू सिमेंटचे शेअर बाजारात सूचीबद्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या कंपनीची उत्पादन क्षमता 20.60 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी आहे. सध्या कंपनीचे देशाच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम राज्यांमध्ये अस्तित्व आहे. कंपनीला उत्तर आणि मध्य भारतातही आपले स्थान निर्माण करायचे आहे. यासाठी कंपनी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड सिमेंट प्लांटवर सुमारे 3000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
याआधी जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ
दरम्यान, जेएसडब्लू सिमेंटने जुलै 2021 मध्ये खाजगी इक्विटी गुंतवणूकदार, अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट आणि सिनर्जी मेटल इन्व्हेस्टमेंट होल्डिंगकडून 1,500 कोटी रुपये उभारले होते. गेल्या वर्षी जेएसडब्लू समूहाची पायाभूत सुविधा कंपनी जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चरने शेअर बाजारात आयपीओ लाँन्च केला होता. जो स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला होता. विशेष म्हणजे या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कंपनीने जोरदार परतावा देखील दिला आहे.