सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/चंद्रकांत कांबळे : ४० ते ५० वर्षे वयोगटातील तसेच पाळी संपण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा रजोनिवृत्ती झालेल्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनतर्फे १४ जानेवारीपासून विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय येथे हे क्लिनिक कार्यरत असून, दर बुधवारी तपासणीसाठी विशेष दिवस निश्चित करण्यात आला आहे. गरजेनुसार इतर दिवशीही रुग्णांची तपासणी केली जाते. ही तपासणी स्ञीरोग विभाग वॉर्ड क्र. २३ मध्ये केली जात असून, अनेक दुर्लक्षित महिला येथे उपचार घेत आहेत.
वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिनी भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन या महत्त्वाच्या हार्मोनची कमतरता निर्माण होते. यामुळे अचानक थकवा येणे, प्रचंड घाम येणे, गरम वाटणे, चक्कर येणे, जास्त रक्तस्राव होणे, पाळी अनियमित होणे, धडधड वाढणे अशा विविध तक्रारी जाणवतात. मात्र, हे तर होतच असते असे समजून अनेक महिलांकडून या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवून त्यांना योग्य वेळी उपचार मिळावेत, या उद्देशाने ‘मेनोपॉज क्लिनिक’ दुर्लक्षित वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आले आहे.
वयाच्या १४-१५ व्या वर्षी पाळी सुरू होताना जसे संपूर्ण कुटुंब मुलीच्या पाठीशी उभे राहते, तसेच समर्थन रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना मिळत नाही. त्या वेळी मुले मोठी झालेली असतात. कामावर गेलेली असतात किंवा काही महिला एकट्याच असतात. या एकटेपणामुळे मानसिक ताण वाढून नैराश्य (डिप्रेशन) येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उपचारांबरोबर समुपदेशनाचीही मोठी गरज भासते. डॉ. भगत यांच्या मते, सुमारे ५० टक्के महिलांना पाळीशी संबंधित त्रास जाणवतो. यासाठी रक्त तपासण्या, सोनोग्राफी आदी चाचण्या केल्या जातात. काही महिलांमध्ये फायब्रॉईड्ससारख्या समस्या निदर्शनास येतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार सुरू केले जातात.
जीवनशैलीत बदल आवश्यक
रजोनिवृत्तीच्या काळात योग्य जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. सात तासांची झोप, पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम, ध्यान यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरते. काही विशेष प्रकरणांमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) दिली जाते. तसेच योनीतील कोरडेपणा किंवा खाज येणे यासाठी इस्ट्रोजेनयुक्त ऑइंटमेंट किंवा लोशनही दिले जाते.
६० ते ७० वयातील समस्या : ‘प्रोलॅप्स’कडे दुर्लक्ष
६० ते ७० वर्षे वयोगटातील महिलांमध्ये ‘प्रोलॅप्स’ ही समस्या आढळते. दहा पैकी तीन ते चार महिलांना ही तक्रार भेडसावू शकते. गर्भाशय खाली येणे किंवा बाहेर पडणे ही गंभीर बाब असूनही लाज किंवा भीतीपोटी अनेक महिला दवाखान्यात येत नाहीत. अशा महिलांना योग्य तपासणी व उपचार देण्याची सुविधा या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे.
समुपदेशनालाच प्राधान्य
उपचारांपेक्षा अधिक गरज समुपदेशनाची असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. अनेक महिलांना आपल्या समस्या उघडपणे मांडता येत नाहीत. पिढ्यान्पिढ्या पाळी संपली की हे होतच असते अशी समजूत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र आता सरकारी रुग्णालयात अत्याधुनिक तपासण्या व उपचार उपलब्ध असल्याने महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्त्रीला ४५ ते ५५ वयोगटात मेनोपॉज येतोच. मात्र धडधड होणे किंवा इतर लक्षणे तीव्र जाणवत असतील तर महिलांनी त्वरित रुग्णालयात येऊन सल्ला घ्यावा. महिलांनी स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे. दररोज थोडा व्यायाम, ध्यान आणि योग्य आहार यामुळे त्रास कमी होऊ शकतो. — डॉ.ऋता मुळे, स्त्रीरोग विभाग प्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय, पुणे






