दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ( सौजन्य - सोशल मीडिया )
राज्य सरकारने 12 ऑक्टोबर 2026 रोजी तिसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता 27 ऑक्टोबर 2026 दिवशी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत राज्यातील जवळजवळ 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दिवाळीपूर्वी चौथी यादी समोर आली आहे. या बातमीमुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत 25 लाख शेतकऱ्यांपैकी 15 लाख 85 हजार 493 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला पण सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील 6 लाख 27 हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे. याबरोबर शासनाने कर्जमाफी योजनेसाठी तब्बल 13 हजार 275 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.
उशीराने अपडेट केलेल्या तसेच केवायसीसाठी उशीर झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी पोहोचलेली नाही अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे. त्याचबरोबर अजून राज्यातील 4 लाख 82 हजार शेतकऱ्यांना केवायसी केलेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
कर्जमुक्ती योजना 2026 च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नेमके हे निकष कोणते जाणून घेऊयात.
कालावधी निकष : 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली शेतीसाठी घेतलेली कर्ज या समाविष्ट आहेत.
कर्जमुक्ती मर्यादा : 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जांसोबतच पीककर्जांसह पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना यात लाभ देण्यात आला आहे.
व्याजमाफीचाही दिलासा : 1 एप्रिल 2026 पासून पुढचे व्याज व इतर खर्च पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 1.50 कोटी शेतकऱ्यांना अग्रीम 5000 रुपयांची दुष्काळी मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. ही मद शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याचे आदेश दिली आहेत. यासगळ्यासाठी 7500 कोटी रुपये एकूण खर्च होणार आहे यासंदर्भातील निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.






