
फोटो सौजन्य AI
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली असून त्यांच्या उत्पादन खर्चातही बचत झाली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत.
जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमती वाढल्या असतानाही त्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले. तसेच गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीतून उत्पन्न मिळविण्याची संधीही उपलब्ध झाली आहे.
बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार नव्या सुधारित बियाण्यांच्या जाती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई शेतकऱ्यांना मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतीसोबत पशुपालन आणि पूरक व्यवसायांनाही महत्त्व देण्याची गरज असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला प्रोत्साहन दिले जात आहे. लाळ्या-खुरकुत रोगापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत सुमारे १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला याचा लाभ झाला आहे.
देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबरला आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.