सरकारी बॅंकांनी ठेवी वाढवण्यावर भर द्यावा; बॅंकांच्या आढावा बैठकीत अर्थमंत्र्यांचे निर्देश!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.१९) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकांमधील ठेवी वाढवणे, डिजिटल पेमेंट, सायबर सुरक्षा, क्रेडिट उत्पादने आणि त्यासंबंधी योजना अशा अनेक मुद्द्यांवर अर्थमंत्र्यांनी बँकांशी चर्चा केली. यावेळी अर्थमंत्र्यांनी सर्व सरकारी बँकांना ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रित करून, ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
ग्राहकांची फसवणूक आणि सायबर सुरक्षेबाबत बँका, सरकार, नियामक आणि सुरक्षा संस्था यांच्यातील सहकार्य वाढले पाहिजे. असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. याशिवाय अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बँकांनी वेगाने पावले उचलण्याची गरज आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना आणि पीएम विश्वकर्मा योजनेवर बँकांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही अर्थमंत्र्यांनी यावेळी बॅंकांना दिले आहेत. या बैठकीला अर्थ विभागाचे सचिव विवेक जोशी, एम. नागराजू, सर्व बँकांचे प्रमुख आणि वित्तीय सेवा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
👉 Union Finance Minister Smt. @nsitharaman chairs meeting to review performance of Public Sector Banks #PSBs in New Delhi
👉 Various financial parameters such as #DepositMobilisation, #DigitalPayments and #CyberSecurity, Implementation of new credit products/ schemes and Access… pic.twitter.com/Gfzmp1EuSd
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 19, 2024
बँकांच्या महसुलात चांगली सुधारणा
निर्मला सीतारामन यांनी यावेळी आर्थिक वर्ष 2024 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या आहे की, बँकांच्या महसुलात चांगली सुधारणा झाली आहे. याशिवाय बॅंकांचा नेट एनपीए देखील 0.76 टक्क्यांवर आला आहे. देशभरातील बँकांचा निव्वळ नफा 1.45 लाख कोटी रुपये इतका आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या आहे. तसेच त्यांनी 27,830 कोटी रुपयांचा लाभांश देखील यावेळी वितरित केला आहे. याशिवाय बँकांनीही बाजारातून ठेवी वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रणालीत काळानुरूप बदल करावेत
बँकांना आपल्या ग्राहकांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष ठेऊन, आपल्या कार्यप्रणालीत योग्य ते बदल करावेत. सायबर धोके लक्षात घेऊन सर्व बँका वेळोवेळी त्यांच्या आयटी प्रणालीमध्ये बदल करावेत. याशिवाय, सर्व बँकांनी एमएसएमईंना आर्थिक सहाय्य वाढविण्यावर काम केले पाहिजे. असे निर्देशही त्यांनी यावेळी बॅंकांना दिले आहेत. याशिवाय सर्व बँकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावेत. तसेच वेळेवर कर्ज भरणाऱ्या ग्राहकांना सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.