पन्हाळा तालुक्यात बिबट्या वन्य प्राण्यांची दहशत (फोटो- सोशल मीडिया)
पन्हाळा तालुक्यात बिबट्या वन्य प्राण्यांची दहशत
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी
बाजारभोगाव: पन्हाळा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली दबला आहे. बिबट्या, गवा रेडे, कोळशिंदा यांचा मोकाट संचार शेतशिवारापुरता मर्यादित राहिला नसून आता तो गाववस्त्यांपर्यंत पोहोचला आहे. हातात कुदळ-कोयता घेऊन शेतात जाणारा शेतकरी आज जिवाच्या भीतीने घराबाहेर पडताना मागे वळून पाहतो. शेतात गेलेला शेतकरी घरी जिवंत परत येईल, याचीही शाश्वती उरलेली नाही. इतकी भयावह परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते. शेतकऱ्याच्या रक्ताच्या घामावर उगवलेले पीक वन्य प्राणी काही मिनिटांत नष्ट करतात आणि शेतकरी हतबलपणे ते पाहत राहतो, हा फक्त आर्थिक नाही, तर मानसिक संहार आहे.
बिबट्यांना रोखण्यास ‘थर्मल ड्रोन’ सह ५०० ट्रॅप कॅमेरे, संगमनेरमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर
नुकसान भरपाईच्या नावाने मिळणारी रक्कम शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. पंचनामे होतात, फाईल फिरते; मात्र हातात येते ती तुटपुंजी मदत. दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी तर अक्षरशः कड्यावर उभा आहे. गुठा दर केवळ १,२९० रुपये—या दरात बियाणे, मजुरी, खते, औषधे, वीज, पाणी कसे भागवायचे? त्यामुळे ऊसाचा दर किमान अडीच हजार रुपये करा, अशी शेतकऱ्यांची आर्त मागणी आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरल्याचा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्याच्या या आक्रोशाची किंमत कोण मोजणार?
योजना जाहीर केल्या जातात, बैठका होतात; पण शेतात उतरणारा शेतकरी मात्र एकटाच आहे. वन्य प्राणी आता जंगलात नाहीत, ते थेट शेतकऱ्याच्या दारात उभे आहेत, ही कटू वस्तुस्थिती प्रशासन नाकारू शकत नाही. आज पन्हाळ्यातील शेतकरी राजा केवळ पीक नव्हे, तर आपले प्राण, आपले कुटुंब आणि आपले भविष्य वाचवण्यासाठी झगडतो आहे. सरकार व वनविभागाने वेळीच ठोस निर्णय घेतले नाहीत, तर उद्या शेती ओस पडेल, आणि त्यावेळी शेतकऱ्याच्या या आक्रोशाची किंमत कोण मोजणार? हा प्रश्न आता संपूर्ण पन्हाळा तालुका विचारत आहे.
‘तुम्ही आमची घरे तोडली आता आम्ही…’; रत्नागिरीतील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्यांचा वावर
वनविभागाने ऊस पिकाची प्रति गुठ्ठा भरपाई दर अडीच हजार रूपये करावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे. शासनाने ठोस भुमिका घ्य़ावी.
– गणपती पाटील, माजी सरपंच पोबरे.
जंगलानजीकच अर्धा एकर शेती आहे. वन्य प्राण्याच्या त्रासामुळे शेती करणं अशक्य आहे. पिकाविणा पाडून ठेवली आहे.
– बाबू करले, पिसात्री
वन्य प्राण्यामुळे पिकांची नुकसान झाल्यास शेतकर्यांनी अर्ज करावेत. पंचनामा करून भरपाई तातडीने देण्यास वनविभाग प्रयत्नशील आहे.
– रुपाली बुचडे, परिमंडल वन अधिकारी, मानवाड






