
Rajesh Exports scam
मुंबई, नवराष्ट्र ब्युरो. बाजार नियामक सेबीने (सेबी) आघाडीची ज्वेलरी निर्यातदार कंपनी राजेश एक्सपोर्ट्स आणि तिच्या प्रवर्तकाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. सेबीच्या अंतरिम आदेशानुसार, कंपनीने आपल्या महसुलाच्या आकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केला आहे आणि १५.१५ लाख कोटी रुपये म्हणजेच १५८.३ अब्ज डॉलर्सच्या निधीचा घोटाळा केला आहे. या धक्कादायक खुलाशाने देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचीही (एलआयसी) चिंता वाढवली आहे. कारण एलआयसीने या वादग्रस्त कंपनीत १०% पेक्षा जास्त हिस्सा घेऊन मोठी गुंतवणूक केली आहे. आश्चर्य म्हणजे, शेअर बाजार आणि या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवणाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली होती. खरे तर, ते २०१४ पासूनच याबद्दल इशारा देत होते, तरीही सेबीला हे ओळखायला इतका वेळ लागला. कंपनीने म्हटले आहे की, हा एक अंतरिम आदेश असून त्याचा अभ्यास केल्यानंतर विचार केला जाईल.
SCAM सेबीच्या तपासात असे उघड झाले आहे की, राजेश एक्सपोर्ट्सने आपल्या परदेशी उपकंपन्यांच्या माध्यमातून अनेक वर्षे आपले कामकाज आणि महसूल फुगवून दाखवला होता. कंपनीचा ९७ ते ९९ टक्के एकत्रित महसूल परदेशी कंपन्यांच्या नावावर दाखवण्यात आला होता, ज्यात प्रामुख्याने स्वित्झर्लंडच्या व्हॅलकॅम्बी एसए कंपनीचा समावेश होता. राजेश एक्सपोर्ट्सने या परदेशी कंपन्यांची आर्थिक माहिती कधीही सार्वजनिकरित्या उघड केली नाही.
सेबीने आपल्या १०९ पानांच्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, त्यांच्या तपासणीत आर्थिक विवरणांमध्ये चुकीची माहिती दिल्याचे, तसेच योग्य खुलासा किंवा सहाय्यक कागदपत्रांशिवाय वैयक्तिक खाती आणि संबंधित संस्थांमार्फत निधी वळवल्याचे आणि त्याचे स्तर वाढवल्याचे उघड झाले आहे.
उघड होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यानंतर, एलआयसीच्या गुंतवणूक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मार्च २०२६ च्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वांत मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार असलेल्या एलआयसीची राजेश एक्सपोर्ट्समध्ये १०.८०% इतकी लक्षणीय हिस्सेदारी आहे.नोंदींवरून असे दिसून येते की, एलआयसीने सप्टेंबर २०२३ पासून कंपनीमधील ही लक्षणीय हिस्सेदारी कायम ठेवली आहे आणि आपल्या गुंतवणुकीत कोणताही बदल केलेला नाही.आकडेवारीनुसार, एलआयसीने अंदाजे २,००० कोटींची गुंतवणूक केली आहे. शेअरच्या किमतीत ८० टक्क्यांनी घसरण झाल्यामुळे, कंपनीला सुमारे १,६०० कोटींचे नुकसान झाले आहे.
| वर्ष | एकत्रित महसूल | उपकंपन्यांना | व्हॅलकॅम्बीचा ऑडिटेड महसूल | फरक |
| २०२१ | २,५८,३०६ | २,५६,२४५ | 586 | 2,55,659 |
| २०२२ | २,४३,१२८ | २,३६,८९० | ७२९ | २,३६,१६३ |
| २०२३ | 3,39,690 | 3,33,928 | ७४३ | 3,33,185 |
| २०२४ | 2,80,676 | 2,75,276 | ५४३ | 2,74,733 |
| २०२५ | ४,२३,०९९ | ४,१६,०७२ | ४२७ | ४,१५,६४६ |