
मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढत असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदार यादीतील नावात दुरुस्तीची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडी भागातील साळुंखे विहार रस्त्यावरील सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर १० ऑगस्ट रोजी संपर्क साधला. निवडणूक आयोगातून बोलत असल्याची बतावणी केली. मतदार यादीत नावाची दुरुस्ती करायची आहे, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांच्या बँक खात्याची माहिती चोरट्यांनी घेतली. नंतर चोरट्यांनी बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने १० लाख रुपये काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात वर्ग करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक
शेअर खरेदीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिषाने एकाची १४ लाख ३३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. सुरुवातीला काही नफा खात्यात जमा करून विश्वास संपादन केल्यानंतर मोठी रक्कम भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी आशिष शर्मा, मनोज तसेच संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकधारक आणि बँक खातेदारांवर नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राकेश बाळकृष्ण भोसले (वय ५३, रा. द्वारका हाऊसिंग सोसायटी, रायकरमळा, धायरी) यांनी तक्रार दिली आहे. दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २१ जानेवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाली. आरोपींनी शेअर खरेदीवर नफा मिळवून देण्याचे सांगितले. सुरुवातीला काही नफा तक्रारदारांच्या खात्यात जमा करून त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून कोटक महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँकेतील खात्यांत १४ लाख ३३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.