महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान; म्हणाले...
गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा कसोशीचा काळ सुरु आहे. शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार देखील देशातून काढता पाय घेत आहेत. इतकेच काय तर महागाईचा आकडाही वरच्या दिशेने झेपावतो आहे. मात्र, असे असले तरी महागाई नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई नियंत्रणात राहील
जगात अनेक समस्या सुरू असल्याने महागाईवर दबाव आहे. पण देशातील महागाई आणि वाढ यांच्यात ताळमेळ आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई नियंत्रणात राहील. असेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले आहे. सध्याच्या घडीला हवामानातील अनिश्चितता आणि भू-राजकीय समस्यांमुळे महागाईचा आकडा लक्ष्याच्या ४ टक्क्यांच्या वर गेला आहे. मात्र, जानेवारी ते मार्च या तिमाहीत यामध्ये सुधारणा होईल. असेही ते म्हणाले आहे.
8 टक्के आर्थिक विकास दर
मुंबईत आयोजित मॅक्रो वीक 2024 ला संबोधित करताना ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि ताकद यामुळे चलनविषयक धोरण समितीला व्याजदरांव्यतिरिक्त महागाईवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. कोविड 19 चे दुष्परिणाम असूनही, आम्ही गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 8 टक्के आर्थिक विकास दर राखला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्येही ते सुमारे 7.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले आहे.
देशांतर्गत मागणीत वाढ
दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर पुढे बोलताना म्हणाले आहे की, देशांतर्गत मागणीत वाढ होत आहे. याशिवाय देशात उत्पादनही वाढत आहे. देशात खासगी गुंतवणूकही वाढत आहे. सरकारने भांडवली खर्च वाढवणे आणि बँकांचे आर्थिक आरोग्य मजबूत ठेवण्यावर भर दिला आहे. एनबीएफसी देखील चांगली कामगिरी करत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रही गुंतवणूक वाढवून देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. कृषी क्षेत्रातील विकासामुळे ग्रामीण भागातही मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक जगात उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. असेही ते म्हणाले आहे.