ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव; फवारणी खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला!
गेल्या वर्षी एल-निनोचा फटका त्यातच सोयाबीन पिकाला हमीभावाइतका दरही मिळाला नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात उत्पादन खर्चही मिळाला नाही. अशातच आता यावर्षीच्या हंगामात सोयाबीन पिकावर आलेल्या पाने कुडतडणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे. उगवण झालेल्या सोयाबीनचे जवळपास ३० ते ४० टक्के पाने ही अळी खाऊन टाकत आहे. ज्यामुळे ऐन प्राथमिक अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या घ्याव्या लागत आहेत.
वाढीच्या अवस्थेतच फवारणीची वेळ
यावर्षी राज्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. ज्यामुळे अनेक भागांमध्ये मृग नक्षत्रातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मृगाची पेरणी ही रोगराईमुक्त असे म्हटले जाते. मात्र, यावर्षी पेरणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन व इतर पिकावरील अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रामुख्याने ही अळी सोयाबीनची पाने कुरतडून खात आहे. ज्यामुळे आपले सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू असून, अवघ्या दहा ते पंधरा दिवसात पहिली फवारणी करावी लागत आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात फवारणीवरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून, फवारणी खर्चाबाबत चिंताग्रस्त आहेत.
मागील वर्षीच्या हंगामात सोयाबीन पिकाचे गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले. तर यंदा पावसाळा लवकर सुरु झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ वाटावरणामुळे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाचे जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान करत आहे. ज्यामुळे सोयाबीन पिकाला यंदा लवकरच फवारणी घ्यावी लागली आहे. एका फरवणीसाठी जवळपास एकरी २००० रुपये इतका खर्च येत आहे.
– संतोष काळे, (शेतकरी) – तेर, उस्मानाबाद.
बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आधीच भाव नाही. मात्र, शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांनी आशेपोटी सोयाबीनची लागवड लवकरच पूर्ण केली. मात्र, गेले काही दिवस पावसाने ओढ दिल्याने, ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच औषधांचा खर्च देखील अधिक आहे. ज्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.
– अमोल नाईकवाडी, (शेतकरी) – तेर, उस्मानाबाद.