...याला म्हणतात बिझनेस! काहीही न देता... झोमॅटोने उकळले तुमच्याकडून 83 कोटी रुपये! वाचा... कसे ते?
बिझनेस करणे म्हणजे कोण्या वेड्या गबाळ्याचे काम नव्हे! ही म्हण झोमॅटोने खरी करून दाखवली आहे. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून ते मार्च २०२४ या महिन्यापर्यंत ग्राहकांना एक पैशाचेही सामान न देता, झोमॅटोने 83 कोटी रुपये कमावले आहे. तुम्हाला हे वाचून नवल वाटले असेल. मात्र, हे खरे आहे. झोमॅटो ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी एक कंपनी असून, या कंपनीने या वर्षी ऑगस्ट २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीपर्यंत ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म फी म्हणून 83 कोटी रुपये कमावले. कंपनीच्या वार्षिक अहवालात ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.
नेमके काय असते प्लॅटफॉर्म शुल्क?
जेव्हा एक ग्राहक म्हणून तुम्ही स्वीगी किंवा झोमॅटोवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करतात. तेव्हा तुम्हाला तुमच्या ऑर्डरच्या एकूण किमतीसह अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. याला ‘प्लॅटफॉर्म फी’ किंवा ‘प्लॅटफॉर्म शुल्क’ म्हणतात. कंपनीने सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये प्रति ऑर्डर 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली. मात्र, आता हळूहळू त्यात 6 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. झोमॅटोची प्रतिस्पर्धी स्वीगी देखील प्रत्येक ऑर्डरवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारते.
हेही वाचा : लंडनमध्ये ‘या’ भारतीयाने खरेदी केले 1,446 कोटींचे घर; मुकेश अंबानींनाही सोडले मागे!
कंपनीच्या उत्पन्नात 27 टक्क्यांनी वाढ
प्लॅटफॉर्म फी झोमॅटोच्या कमाईला चालना देणाऱ्या तीन प्रमुख घटकांपैकी एक असल्याचे म्हटले गेले आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी वाढून, 7,792 कोटी रुपये झाले आहे. झोमॅटोच्या अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षात रात्री उशिरा आलेल्या बहुतांश ऑर्डर दिल्ली-एनसीआरमधून आल्या होत्या. तर नाश्त्याच्या सर्वाधिक ऑर्डर बेंगळुरूहून आल्या होत्या.
प्लॅटफॉर्म शुल्काचा परिणाम
प्लॅटफॉर्म शुल्कामुळे ग्राहकाने केलेल्या ऑर्डरच्या किमतीमध्ये वाढ होते. यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा थोडी महाग होते. काही रेस्टॉरंट्स त्यांच्या मेनूच्या किमतींमध्ये हे शुल्क समाविष्ट करतात. त्यामुळे अशा रेस्टॉरंट्समध्ये त्या मेन्यूची किंमत वाढते.
हेही वाचा : हायस्कुलला असतानाच शिक्षण सोडले; तरुणाने 19 व्या वर्षीच उभी केली 136 कोटींची कंपनी!
का आकारले जाते हे शुल्क?
स्विगी आणि झोमॅटो यांना आपले ॲप्स आणि वेबसाइट्स अपडेट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सतत गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे ग्राहकांकडून हे शुल्क आकारले जाते. हे शुल्क ग्राहकांची ऑर्डर ग्राहकांपर्यंत घरी पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी पार्टनरला पैसे देण्यासाठी देखील वापरली जाते. याशिवाय मार्केटिंग, ग्राहक सेवा आणि अन्य बाबींसाठी देखील ही रक्कम वापरली जाते.