लंडनमध्ये 'या' भारतीयाने खरेदी केले 1,446 कोटींचे घर; मुकेश अंबानींनाही सोडले मागे!
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनमधील दुसरे सर्वात महागडे घर खरेदी करत इतिहास घडवला आहे. या आलिशान घराचा व्यवहार गेल्या वर्षी झाला होता. त्याची किंमत तब्बल 1,446 कोटी रुपये आहे. हे घर अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची उपकंपनी सीरम लाईफ सायन्सेसने विकत घेतले आहे.
यूकेमध्ये राहण्यासाठी ठरणार उपयोगी
४२ वर्षीय अब्जाधीश अदार पूनावाला यांनी हायड पार्कजवळ असलेले हे एक शतक जुने अबरकॉनवे हाऊस विकत घेतले आहे. हे घर पोलंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिवंगत उद्योगपती जान कुल्झिक यांची मुलगी डोमिनिका कुल्झिक हिचे होते. हे घर कंपनी आणि पूनावाला कुटुंबासाठी यूकेमध्ये राहण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. पूनावाला कुटुंबीयांचा कायमस्वरूपी ब्रिटनमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : हायस्कुलला असतानाच शिक्षण सोडले; तरुणाने 19 व्या वर्षीच उभी केली 136 कोटींची कंपनी!
ठरले दुसरे सर्वात महागडे घर
अबरकॉनवे हाऊस हे घर लंडनमध्ये विकले जाणारे दुसरे सर्वात महागडे घर ठरले आहे. याआधी सर्वात महाग घर म्हणून 2-8A रटलँड गेट ठरले होते. जानेवारी 2020 मध्ये 2-8A रटलँड गेट हे घर तब्बल 19,000 कोटी रुपयांना विकले गेले होते. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे माजी क्राउन प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीझ यांच्या इस्टेटमधून एव्हरग्रेंडचे संस्थापक आणि अध्यक्ष हुई का यान यांनी हे घर विकत घेतले आहे.
कोण आहेत अदार पूनावाला?
अदार पूनावाला हा सायरस पूनावाला यांचा मुलगा आहे. सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती १.८ लाख कोटी रुपये आहे. अदारने स्वतः स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2011 मध्ये अदार पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून कंपनीला नवीन दिशा मिळाली. तर कोरोना महामारीमध्ये लस निर्मिती करत, अदार पूनावाला यांनी जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा : 1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; ‘या’ कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
लंडनमध्ये मुकेश अंबानी यांचे आलिशान हॉटेल
लंडनमध्ये अनेक भारतीय उद्योगपतींची आलिशान घरे आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे स्टोक पार्कमध्ये आलिशान हॉटेल आहे. या 49 बेडरूमच्या हॉटेलमध्ये 13 टेनिस कोर्ट, 14 एकर खाजगी गार्डन आणि 27-होल गोल्फ कोर्स आहे. हे हॉटेल मुकेश अंबानी यांनी 2020 मध्ये 529 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याचप्रमाणे लक्ष्मी मित्तल यांचेही लंडनमधील पॉश भागात अनेक बंगले आहेत. बिशप अव्हेन्यू येथे असलेला समर पॅलेस हे त्यांचे आलिशान घर असल्याचे सांगितले जाते.