
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई, नीता परब : विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका पेपरफुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट सूचना दिली होती. मात्र, या सूचनेची अंमलबजावणी करण्याऐवजी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यासच आरोप अभाविप केला आहे. राज्य सरकारची स्पष्ट भूमिका असतानाही सीआयडी चौकशी टाळण्यामागे नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सवाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर अभाविप मुंबई महानगरतर्फे बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
“पेपरफुटीतील दोषींना अभय देणे बंद करा”, “सीआयडी चौकशी तात्काळ करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या मौन, निष्क्रियता आणि टाळाटाळीच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवत निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशीची मागणी यावेळी कऱण्यात आली.
अभाविपने उपस्थित केलेले प्रश्न
मुंबई विद्यापीठ प्रशासन स्वतःच्या विद्यापीठातील टीवायबीकॉम पेपरफुटी प्रकरणाला दुय्यम स्वरूपाचे समजत आहे का? राज्यभरातील इतर परीक्षा व्यवस्थांमध्ये, विशेषतः टीईटीसारख्या प्रकरणांमध्ये तातडीने कारवाईची भूमिका घेतली जाते; मात्र स्वतःच्या विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रकरणात प्रशासनाचे मौन आणि उदासीनता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणतीही पेपरफुटी कमी-अधिक गंभीर असू शकत नाही. टीईटीप्रमाणेच मुंबई विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरणाचीही निष्पक्ष, स्वतंत्र आणि कठोर चौकशी झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली.
पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणात सीआयडी चौकशीला विरोध करण्यामागे नेमके कोणते हितसंबंध आहेत? कोणाचा दबाव काम करत आहे? राज्य सरकारची स्पष्ट सूचना असतानाही चौकशीपासून पळ काढण्यामागे कोणाला संरक्षण दिले जात आहे? या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आणि व्यवस्थापन परिषदेने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाची तात्काळ सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, मुख्य सूत्रधारांसह सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्य सरकारच्या स्पष्ट सूचनेची अंमलबजावणी का करण्यात आली नाही याचा खुलासा तातडीने करण्यात यावा. अन्यथा अभाविपच्या वतीने राज्यव्यापी आणि अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी अभाविप मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी म्हणाले, “राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत सीआयडी चौकशीची स्पष्ट सूचना दिल्यानंतरही मुंबई विद्यापीठाने ती अक्षरशः धाब्यावर बसवली. ही केवळ प्रशासकीय हलगर्जी नसून सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशय निर्माण करणारी बाब आहे. स्वतःच्या विद्यापीठातील टीवायबीकॉम पेपरफुटी प्रकरणाला दुय्यम समजून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही अभय मिळू देणार नाही. सीआयडी चौकशी सुरू होईपर्यंत, प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर येईपर्यंत अभाविपचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील.”