
अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांची संख्या घटली
छत्रपती संभाजीनगर: अभियांत्रिकी क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये कम्युटर आणि त्याच्याशी निगडित कृत्रिम प्रज्ञा, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, माहिती तंत्रज्ञान, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अशा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यंदा घटल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांपैकी १०८ मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, सिव्हिल या मूलभूत मानल्या जाणाऱ्या शाखांकडे विद्यार्थी पुन्हा वळले असून, काही नव्या अभ्यासक्रमांनाही पसंती मिळत आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील १०८ अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी सीईटी परीक्षा घेतली जाते. या १०८ पैकी ३५ अभ्यासक्रम कम्प्युटर, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, एआय एमएल, डेटा सायन्स, आयटी या विषयांशी निगडित आहेत. गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. २०२३-२४मध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंगसाठी उपलब्ध जागांच्या ८८.१७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२४-२५ मध्ये हे प्रमाण ९०.४५ टक्क्यांवर गेले. यंदा मात्र हे प्रमाण थेट ८६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ उत्साहात! देशभक्तीपर उपक्रम पडले पार
अधिकाऱ्यांनाही आश्चर्य
आयटीमध्ये हे प्रमाण ९२.९८ टक्क्यांवरून ९३.२३ टक्क्यांवर गेले होते आणि यंदा ८७.५० टक्क्यापर्यंत खाली आले. रसायन, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रिकल या मूलभूत मानल्या जाणाऱ्या शाखांकडे विद्याथ्यांचा कल वाढला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी गेल्या वर्षी उपलब्ध जागांच्या ६९.८८ टक्के प्रवेश झाले होते.
यंदा ही टक्केवारी वाढून ७१.७३ टक्क्यापर्यंत गेली. सिव्हिल इंजिनिअरिंग ६४ टक्क्यांवरून ७१ टक्क्यांवर, इलेवट्रिकल इंजिनिअरिंग ७१ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांवर आणि केमिकल इंजिनिअरिंगसाठीचे प्रवेश ८५ टक्क्यांवरून ८७टक्क्यांवर पोहोचले आहेत. कम्प्युटरशी निगडित शाखांमधील अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या घटल्याने ‘सीईटी’ कक्षातील काही अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
आय-एमएल, डेटा सायन्सकडे कमी कल
गेल्या काही वर्षांत एआय-एमएल, डेटा सायन्स या क्षेत्रांचे महत्त्व वाढले. पण, यंदा या विषयांशी निगडित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती घटली आहे. गेल्या वर्षी एआय-डेटा सायन्स अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांपैकी ९२ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. यंदा ही आकडेवारी ८८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. एआय-एमएलचे प्रवेशही एक टक्क्याने घटले आहेत.