फोटो सौजन्य - Social Media
‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Nashik ) शाळाप्रवेश दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्ती, ऐक्य आणि समाजभानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पळसे येथील नासाका विद्यालयात या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. तालासुरात सादर झालेल्या या गीतानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच ‘वंदे मातरम्’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सृष्टी आडके, प्रियंका काजळे, श्रीरंग मुंजे, साक्षी मोरे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून पारितोषिके मिळवली.
दरम्यान, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित टिब्रेवाला इंग्लिश मीडियम शाळेतही ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन करून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभाग शालेय समितीचे अध्यक्ष अॅड. संजय खरोटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना दृढ होते,” असे मत व्यक्त केले. इगतपुरीतील नायडी डोंगरावर कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी विशेष उपक्रम राबवला. भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहकांनी डोंगरावर तिरंगा फडकावून ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला. या वेळी देशभक्तीच्या घोषणा देत वातावरण भारावून गेले.
तसेच चांदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’ या गीतातील अर्थ आपल्या जीवनात उतरवण्याचे आवाहन केले. “देशाच्या एकतेसाठी हे गीत केवळ राष्ट्रभक्तीचे प्रतीक नाही, तर प्रेरणेचा स्रोत आहे,” असे त्यांनी सांगितले. जिल्हाभर झालेल्या या कार्यक्रमांमुळे ‘वंदे मातरम्’चा जयघोष घुमला. देशभक्तीचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना जागवली गेली.






