फोटो सौजन्य - Social Media
अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न अनेक जणं पाहतात. ते सत्यात उतरवण्यास अनेक विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून येतात आणि डिप्लोमाचे शिक्षण घेतात. डिप्लोमा घेऊनही पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात. पण या टप्प्यात येताच विद्यार्थ्यांची नाचक्की सुरु होते, कारण राज्यात अभियांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी फार जागा शिल्लक नसते. मुळात, त्यांच्यासाठी केवळ १०% जागा राखीव आहे, जी संख्या घट केलेली आहे.
आधी, डिप्लोमा उमेदवारांना पदवी शिक्षणात येण्यासाठी २०% जागा शिल्लक होती. ज्यात ५०% घट करून, ती संख्या १०% आणली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकवर्ग नाराज आहेत. त्यांच्याकडून ही संख्या पुन्हा २०% वर करण्यात यावी, अशी मागणी गेले अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यांच्या मते, सरकारच्या या निर्णयामुळे, विद्यार्थ्यांच्या करिअरवर प्रभाव पडत आहे. इच्छा असूनही मुलांना शिकता येत नाही आहे. मन मारून त्यांना सिव्हिल किंवा मॅकेनिकल क्षेत्रात जावे लागत आहे. सरकार या बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा विद्यार्थी तसेच पालकांनी दर्शवली आहे.
पदविका शिक्षणात अगदी ७५% ते ८५% गुण असणाऱ्या उमेदवारांनाही पदवी शिक्षणात प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रकल्पांची उमेद नागरिकांच्या मनात तयार करत आहे. आणि अशावेळी तंत्रज्ञान शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यामध्ये नाचक्की होत आहे, हे अतिशय दुर्दैवी असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते, पदविका शिक्षण घेणारा उमेदवार पदवी अभ्यासक्रमात थेट दुसऱ्या वर्षी जातो. अशामध्ये बदल झाल्यामुळे त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
जागांमध्ये करण्यात आलेली घट पुन्हा २०% करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी केली आहे. यावर कधी निर्णय घेण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.