फोटो सौजन्य - Social Media
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात आलेल्या बीएड (जनरल व स्पेशल) तसेच बीएड (इएलसीटी) अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) शनिवारी मोठ्या प्रमाणावर पार पडल्या. काही तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता परीक्षा सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे दोन परीक्षा केंद्रे रद्द करण्याची वेळ आल्याने काही विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. State Common Entrance Test Cell मार्फत ही परीक्षा तीन सत्रांमध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ आयोजित करण्यात आली होती. तिन्ही सत्रांमध्ये मिळून ८८.२० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली, अशी माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली.
या परीक्षेसाठी एकूण १,१०,०४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४,०४१ विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी घेण्यात आली. सकाळच्या सत्रात २१,५५३ विद्यार्थ्यांपैकी १९,३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यानुसार या सत्रात ८९.६१ टक्के उपस्थिती नोंदवली गेली, तर २,२३९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. सकाळचे सत्र नियोजित वेळेत आणि संगणकाधारित पद्धतीने शांततेत पार पडले.
दुपारच्या सत्रातही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम राहिला. २२,३०५ विद्यार्थ्यांपैकी १९,५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे या सत्रात ८७.७७ टक्के उपस्थिती नोंदली गेली, तर २,७२८ विद्यार्थी गैरहजर होते. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील १७२ परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली.
सायंकाळच्या सत्रात १०,१८३ विद्यार्थ्यांपैकी ८,७७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या सत्रात ८६.१५ टक्के उपस्थिती नोंदवली गेली, तर १,४२७ विद्यार्थी अनुपस्थित होते. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत हे सत्र पार पडले. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे दोन परीक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आल्या असून संबंधित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेबाबत निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. एकूणच, काही अडथळे असूनही बीएड सीईटी परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे दिसून आले.






