
फोटो सौजन्य - Social Media
नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन बी. डी. भालेकर शाळेच्या जागी पुन्हा नवी शाळाच उभारण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. “मी आयुक्त, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या ठिकाणी पुन्हा शाळाच बांधली जाईल, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे,” असे ते म्हणाले.
गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचा अभाव असल्याने भालेकर शाळा बंद करण्यात आली आहे. तसेच ही इमारत जुनी आणि धोकादायक झाल्याने ती पाडण्याचा निर्णय मनपाने घेतल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन, जर इमारत पाडणे आवश्यक असेल तर ती पाडावी, मात्र त्या ठिकाणी शाळाच बांधावी, या भूमिकेवर भुसे ठाम आहेत. त्यामुळे येथे इमारत जरी पाडली गेली तरी त्या ठिकाणी पुन्हा शाळाच उभारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मनपाने भालेकर शाळेच्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा प्रस्ताव दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी विद्यार्थी आणि शहरवासीयांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. मात्र मनपा आयुक्त मात्र शाळा पाडण्यावर ठाम असल्याने हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे नाशिक दौऱ्यावर असताना “शाळा वाचवा समिती”च्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी भुसे यांनी सांगितले की, “या विषयावर मी आधीच आयुक्तांशी चर्चा केली असून त्यांनी विद्यार्थ्यांचा अभाव आणि इमारतीचा धोका याचे कारण सांगितले आहे. तरी मी नाशिककरांच्या भावना मुख्यमंत्री आणि शासनापर्यंत पोहोचवणार आहे. धोकादायक इमारत पाडल्यानंतर त्या जागी भव्य शाळाच उभारली जावी, यासाठी मी स्वतः आग्रही भूमिका मांडेल.”
शहरातील नागरिकांच्या भावनांचा आदर राखून शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे भालेकर शाळेच्या भवितव्याबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यामुळे जर हाच निर्णय घेतला गेला तर नाशिककरांच्या भावना नक्कीच सुखावतील असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.