पोरांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर (Photo Credit- X)
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) अखेर बहुप्रतिक्षित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC – बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC – दहावी) परीक्षांच्या २०२६ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाचे सचिव प्रमोद गोफणे यांनी सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. HSCच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून, त्या 18 मार्चपर्यंत चालतील. तर SSC च्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत असतील.
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले गेले आहे. बारावीत तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत, तर दहावीत तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहेत.
परीक्षांचे वेळापत्रक (टाइमटेबल):
परीक्षा | लेखी परीक्षा (Written Exams) | प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षा (Practical/Oral) |
HSC (बारावी) | १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ | २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ |
SSC (दहावी) | २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ | २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ |
बोर्डाने गेल्या वर्षी सुरू केलेला HSC आणि SSC परीक्षा लवकर घेण्याचा पॅटर्न यावर्षीही कायम ठेवला आहे. लवकर परीक्षा घेतल्याने निकाल वेळेवर जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
साधारणपणे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा ऑगस्टपर्यंत जाहीर होतात. मात्र, यावर्षी तारखा जाहीर होण्यास विलंब झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाढलेली चिंता या घोषणेमुळे दूर झाली आहे.
गतवर्षी प्रथमच दोन्ही परीक्षा फेब्रुवारीत सुरू होऊन निकालही लवकर लागले होते, ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. यावर्षीही दोन्ही परीक्षांची सुरुवात फेब्रुवारीमध्येच होत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या मुख्य तारखा जाहीर केल्या असल्या तरी, विषयनिहाय सविस्तर आणि अंतिम वेळापत्रक लवकरच स्वतंत्रपणे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी पुढील माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
SSC ची सोशल मीडियाची एंट्री, परीक्षेपासून निकालापर्यंत…इथे मिळेल सर्व तपशीलवार अपडेट