फोटो सौजन्य - Social Media
जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि पालकांमध्ये शासकीय शाळांबद्दल विश्वास निर्माण करणे या उद्देशाने ‘गुढीपाडवा पट वाढवा’ हा उपक्रम उत्साहात सुरू करण्यात आला आहे. Zilla Parishad Satara च्या शिक्षण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, मुख्य कार्यकारी अधिकारी Yashni Nagarajan यांच्या संकल्पनेतून याची सुरुवात झाली.
या उपक्रमाचा शुभारंभ कराड तालुक्यातील उंब्रज येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच ‘शैक्षणिक गुढी’चे पूजन करून नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात करण्यात आली. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत त्यांनी परिसरातील मॉडेल स्कूलच्या बांधकामाचीही पाहणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच शिक्षणासाठी पाठवा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. शिक्षण विभाग राज्यात आदर्शवत ठरेल, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेण्यात आली. तसेच एप्रिल महिन्यात शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, ज्या शाळा व्यवस्थापन समित्या विद्यार्थ्यांचा पट वाढवण्यात यशस्वी ठरतील त्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी संमती देशमाने यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाभर हा उपक्रम उत्साहात राबविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.






