मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे; विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद (फोटो सौजन्य-Gemini)
‘माईंडक्राफ्ट’ संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सायकॉमैट्रिक चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, कौशल्ये आणि आवडी-निवडींचे विश्लेषण करून त्यांना योग्य करिअर पर्यायांची दिशा दाखविण्यात आली.
या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखून योग्य निर्णय घेण्यास मदत झाली. तज्ज्ञांच्या सत्रांमध्ये परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, अर्ज प्रक्रिया, स्टेटमेंट ऑफ पर्पज, तसेच मुलाखत तंत्र यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. चंद्रशेखर मालवी यांनी ‘लाईफ स्किल्स’चे महत्त्व अधोरेखित करत संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापन यांसारख्या गुणांची जागतिक स्तरावर असलेली गरज स्पष्ट केली.
डॉ. शशी चाला यांनी ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप’ योजनेची सखोल माहिती देत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि लाभ यांचे सुस्पष्ट मार्गदर्शन केले.
डॉ. अनुप कुमार तिवारी यांनी विविध खासगी शिष्यवृत्तींचे पर्याय आणि त्यासाठीची व्यूहरचना उलगडून सांगितली. त्यांनी सर्व प्रगत देशांतील विविध क्षेत्रामधील शिष्यवृत्तीची माहिती देताना प्रत्येक देशातील शिष्यवृत्तीसाठीची पात्रता, शिष्यवृत्तीचे स्वरूप, एकूण रक्कम, कालावधी आणि अटी यांची विस्तृत माहिती दिली.
तर एडवर्ड मेंढे यांनी महाराष्ट्र शासनाच्या परदेशी शिक्षण योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याच्या विविध पर्यायांची जाणीव करून दिली. तज्ज्ञांच्या अनुभवाधारित मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची दिशा मिळाली.
अनेक विद्याथ्यांनी संवाद सत्रात शंका विचारून आपल्या करिअर नियोजनाबाबत स्पष्टता मिळवली.
गुणवत्ता असूनही माहितीअभावी अनेक विद्यार्थी जागतिक संधींपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. मनीषा कर्णे यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी डॉ. संतोष राठोड, डॉ. राकेश मालुसरे, हरी सोवनी, विजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.






