फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Student Suicides Report 2026: देशातील आयआयटी (IIT) संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि अनैसर्गिक मृत्यूबाबत एक अहवाल समोर आला आहे. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, २००६ ते सप्टेंबर २०२६ दरम्यान आयआयटीमध्ये १७३ विद्यार्थ्यांचा आत्महत्या किंवा अनैसर्गिक परिस्थितीत मृत्यू झाला. यातील जवळपास ७० टक्के प्रकरणे गेल्या १० वर्षांत नोंदवली गेली आहेत. ही आकडेवारी ‘ग्लोबल आयआयटी ॲल्युम्नाय सपोर्ट ग्रुप’चे (Global IIT Alumni Support Group) संस्थापक आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांच्या विश्लेषणावर आधारित आहे. त्यांच्या अहवालानुसार, २००६ ते २०१५ दरम्यान ५१ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर २०१६ ते सप्टेंबर २०२६ या काळात ही संख्या वाढून १२० वर पोहोचली आहे. या आकडेवारीत एकूण किमान १७१ मृत्यूंच्या नोंदींचा समावेश आहे.
या अहवालातील माहितीनुसार, आत्महत्येच्या एकूण प्रकरणांपैकी तब्बल ८२ टक्के घटना आयआयटी कॅम्पसच्या आत घडल्या आहेत. कॅम्पसमध्ये परीक्षा किंवा निकालाचा काळ असतो, तेव्हा या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तर समसत्र सुट्टीच्या (Semester break) काळात अशा प्रकरणांमध्ये घट पाहायला मिळाली आहे. अहवालानुसार, केवळ विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मृत्यूच्या या वाढत्या प्रमाणाचे स्पष्टीकरण देता येणार नाही. त्यांनी याला विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि संस्थात्मक व्यवस्थापनाशी जोडलेला एक गंभीर मुद्दा म्हटले आहे.
आयआयटी संस्थांमधील आत्महत्येचा हा मुद्दा अलीकडेच घडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या प्रकरणांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २२ ऑगस्ट रोजी आयआयटी दिल्लीमध्ये ३१ वर्षीय एम.एस्सी. फिजिक्सचा विद्यार्थी ऋषिकेश कुमार याचा मृत्यू झाला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेने बाह्य चौकशी समितीही स्थापन केली होती.
या घटनेनंतर १८ सप्टेंबर रोजी आयआयटी बॉम्बेमध्ये २० वर्षीय बी.टेक.चा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा मृत्यू झाला. साहिलच्या मृत्यूआधी, मध्य-सत्राच्या (Mid-semester) परीक्षेदरम्यान मोबाईल फोनवर AI द्वारे पेपरचे प्रश्न शोधताना तो पकडला गेला होता, असे सांगितले जात आहे. साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये आंदोलने झाली. आयआयटी बॉम्बेने नंतर या घटनेपूर्वीच्या परिस्थितीबाबत दिलेल्या सुरुवातीच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आणि चौकशी सुरू असताना असे वक्तव्य करणे योग्य नव्हते, असे स्पष्ट केले.
धीरज सिंह यांच्या अहवालात पुरुष बी.टेक. विद्यार्थी आणि महिला पीएच.डी. स्कॉलर यांना विशेषतः जास्त संवेदनशील गट म्हणून घोषित केले आहे. या दोन्ही गटांचा मिळून गेल्या दोन दशकांत नोंदवलेल्या आत्महत्यांमध्ये जवळपास ६० टक्के वाटा आहे. तसेच सामाजिक श्रेणीनुसारही यात फरक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अहवालानुसार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधील विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा दर सामान्य श्रेणीच्या तुलनेत जवळपास दुप्पट होता आणि या विद्यार्थ्यांचा मृत्यू तुलनेने कमी वयात झाला. याशिवाय, कोविडनंतरच्या काळात SC विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचा दर सामान्य श्रेणीच्या तुलनेत २.६ पट आणि ST विद्यार्थ्यांमध्ये ४.२ पट राहिल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी अहवालात १४ कलमी धोरणाचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे मित्र, ज्येष्ठ विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांद्वारे पद्धतशीर मेंटरिंग, धोका असलेल्या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर ओळख पटवणे, गोपनीय मानसिक आरोग्य सेवा आणि कॅम्पस पातळीवर मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण यांचा समावेश आहे.
याशिवाय प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, संस्थांच्या कल्याणाचा एनआयआरएफ (NIRF) रँकिंगमध्ये समावेश करणे, आयआयटीमध्ये स्वतंत्र वेलबीइंग नेतृत्व नियुक्त करणे आणि पूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून पुनरावलोकन करणे यांसारखे महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. दरम्यान, ही आकडेवारी माहिती अधिकार (RTI) आणि मीडिया रिपोर्ट्स एकत्रित करून तयार करण्यात आली आहे; हा आयआयटी विद्यार्थ्यांच्या मृत्यूंचा कोणताही केंद्रीय अधिकृत डेटाबेस नाही.






