रेल्वे भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर) पदाच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेमध्ये नोकरीची इच्छा बाळगून असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे भरती मंडळाच्या माहितीनुसार, कनिष्ठ अभियंता (सुरक्षा आणि गैर-सुरक्षा) या पदासाठीच्या 7911 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
काय आहे पदासाठीची पात्रता?
रेल्वे भरती मंडळाकडून येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. आरआरबीच्या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा झालेले उमेदवार हे या भरतीसाठी पात्र असणार आहे. रेल्वे भरती मंडळाकडून ही कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ज्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना ही सुवर्ण संधी असणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
किती आहे वयोमर्यादा?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
कशी असेल निवड प्रक्रिया?
रेल्वे भरती मंडळाकडून कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल पर्यवेक्षक आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक यासारख्या विविध पदे भरण्यासाठी एक 100 गुणांची दीड तास वेळ असलेली लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन लागू असणार आहे. दरम्यान, उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जातील आवश्यक माहिती भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर, एक प्रिंट सांभाळून ठेवा.