
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; मुलाखतीशिवाय 19 हजार 754 पदांसाठी प्रक्रिया
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे पार पडलेल्या या भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांच्या एकूण १९ हजार ७५४ पदांपैकी १३ हजार १२९ उमेदवारांची विविध पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या मुलाखतीशिवाय निवड प्रकाराची गुणवत्ता यादी गुरुवारी (दि.२७) सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उर्वरित रिक्त पदांसाठी लवकरच ‘कन्व्हर्जन राउंड’ (समांतर आरक्षण रूपांतरण फेरी) राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे, राजेश शिंदे या वेळी उपस्थित होते. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शाळा व्यवस्थापनांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ३०,२०९ पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले होते.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मधील गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही ऑनलाइन चाचणी २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका-नगरपरिषद, महापालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन, खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीविना निवड या प्रकारासाठी एकूण १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १३ हजार ११९ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी ७५४१, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ४२०७, नववी ते दहावी या वर्गांसाठी १११९, अकरावी ते बारावी या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेबाबत उमेदवारांचे म्हणणे, मागणी किंवा तक्रारींचा विचार करण्यासाठी राज्यस्तरावर ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपल्या edupavitra२०२५grcc@gmail.com या तक्रारी ६ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रेसनोटमध्ये नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षित रिक्त पदांसाठी ‘कन्व्हर्टेड राउंड’
समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे माजी सैनिक प्रवर्गातील २ हजार ७६० आणि अंशकालीन प्रवर्गातील १ हजार ७६० पदे रिक्त राहिली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ तसेच पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १ हजार ४०८ पदेही रिक्त राहिली आहेत. ही पदे भरण्यासाठी पुढील टप्प्यात ‘कन्व्हर्टेड राउंड’ घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.