फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवून अंतरिम गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन टॉपर उमेदवारांसह दोन मध्यस्थांना अटक करण्यात आली आहे. या नव्या अटकेमुळे या घोटाळ्यातील एकूण आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
तपासात उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक असून, अटक करण्यात आलेला आरोपी साजिद संदे हा १५२.५० गुण मिळवून तिसऱ्या स्थानी होता, तर विजय किंगर याने १५६ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला होता. याआधी अटक केलेली ऋतुजा पाटील हिने देखील १५५ गुण मिळवून सातवा क्रमांक पटकावला होता.
हे अव्वल गुण मिळवणारे संशयित उमेदवार आता गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. गुन्हे शाखेने साजिद संदे याला सांगोला येथून, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेतले आहे. तसेच मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणारे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर संदीप खलाटे आणि भारतीय नौदलात सिव्हिल टेक्निशियन असलेला भैरवनाथ कदम यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी MPSC चा अवर सचिव अभिजीत लेंडवे याने मध्यस्थांमार्फत हा पेपर फोडल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यासह विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, प्रवीण पाटील आणि इतर मध्यस्थांना याआधीच अटक करण्यात आली असून सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
२२ जुलै रोजी जाहीर झालेल्या ४८८ जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना १२१ पर्यंतच गुण मिळाले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक गुण मिळवून अव्वल आलेले आणि इतर परीक्षांमध्ये सामान्य कामगिरी करणारे विद्यार्थी संशयाच्या घेऱ्यात आले, ज्यावर आता या कारवाईमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. MPSC तर्फे २२ मार्च २०२६ रोजी ६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असून आणखी काही उमेदवारांचा सहभाग समोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.






