फोटो सौजन्य AI
शिक्षण किंवा भविष्यातील वाटचालीत कोणत्याही अडचणी आल्यास घाबरू नका, शासन आणि प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुलींच्या समस्या जाणून घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मंत्री आदिती तटकरे यांनी रुखमाबाई बालिकाश्रमातील मुलींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवासाची आणि भोजन व्यवस्थेची माहिती घेतली. बालगृहात उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेत मुलींच्या अडचणीही जाणून घेतल्या.
मुलींनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या समस्या आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. बालगृहांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषक आहार, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
बालिकाश्रमातील मुलींनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घ्यावे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले. स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षणासोबत क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील संधींचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले.
मुली भविष्यात विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत होऊन समाजाच्या विकासात योगदान देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बालगृहातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून मुलींच्या हितासाठी आवश्यक मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा येथील अकरावीतील विद्यार्थिनी आचल धीरज वसावे हिला जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. तिने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.
भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सनदी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न असल्याचे आचलने सांगितले. मुलींमध्ये प्रशासकीय सेवेविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






