
medical admission
NMC Guidelines on Medical Ads: सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या जगात रुग्णांना आकर्षित करण्यासाठी मोठे दावे करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘शंभर टक्के यश’ किंवा ‘खात्रीशीर उपचार’ अशा भूलथापा देणाऱ्या जाहिरातींच्या नादात अनेक जण आपल्या आरोग्याशी मोठा धोका पत्करतात. या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) अत्यंत कठोर पावले उचलली असून, डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच्या जाहिरातींबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
या नवीन आदेशामुळे वैद्यकीय क्षेत्राची गरिमा कायम राखली जाईल, तसेच सामान्य जनता देखील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचेल. आता कोणतेही हॉस्पिटल किंवा डॉक्टर आपल्या सेवांचा प्रचार करण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण दावे करू शकणार नाहीत. NMC च्या या नवीन नियमांच्या कक्षेत वृत्तपत्रे, होर्डिंग्स आणि इन्स्टाग्राम-युट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. अनेक डॉक्टर आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स किंवा पेड रिव्ह्यूचा आधार घेतात, ज्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
एनएमसीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उपचारापूर्वी आणि नंतरचे फोटो (Before-After Photos) दाखवणे किंवा खोटे लाइक्स आणि व्ह्युजच्या माध्यमातून आपली प्रतिमा उंचावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन निलंबित करण्यासोबतच भारी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.
या नव्या नियमांमुळे आता कोणतीही व्यक्ती किंवा वैद्यकीय संस्था ‘१०० टक्के यश’, ‘खात्रीशीर उपचार’, ‘चमत्कारी इलाज’, ‘वेदनामुक्त उपचार’ आणि ‘नंबर-१ स्पेशलिस्ट’ यांसारख्या शब्दांचा वापर करू शकणार नाही. तसेच, जोपर्यंत ते शास्त्रीय किंवा निष्पक्ष पुराव्यांनी सिद्ध होत नाही, तोपर्यंत ‘सर्वात उत्तम’ किंवा ‘सर्वात भरोसेमंद’ असे दावे देखील करता येणार नाहीत.
तसेच, डॉक्टर आपल्या प्रचारासाठी रुग्णांचे टेस्टिमोनियल्स किंवा शिफारशी वापरू शकत नाहीत आणि सोशल मीडियावर रुग्णांकडे रिव्ह्यू मागण्यासही मनाई करण्यात आली आहे. सेवांच्या प्रचारासाठी कोणत्याही सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर किंवा तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. एआय (AI) द्वारे तयार केलेल्या जाहिराती, स्पॉन्सर्ड पोस्ट, तसेच बनावट फॉलोअर्स, लाइक्स आणि पेड रिव्ह्यूचा वापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय विनाकारण वैद्यकीय चाचण्या किंवा उपचारांसाठी लोकांना आकर्षित करणाऱ्या सवलती, कूपन्स, कॅशबॅक किंवा मोफत उपचारांच्या प्रचारावरही पूर्णपणे चाप लावला गेला आहे.