फोटो सौजन्य- सोशल मीडिया
संभाव्यता सिद्धांत (Probability Theory) आणि सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील (Statistical Physics) त्यांच्या कार्याबद्दल इन्फोसिस प्राइज 2026 (Infosys Prize 2026) च्या गणितीय विज्ञान (Mathematical Sciences) श्रेणीत ज्या योगदानाला गौरवण्यात आले, त्यामध्ये ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’ (Slow-Bond Problem) या महत्त्वाच्या निष्कर्षांचे यश आहे.
स्लो बॉन्ड प्रॉब्लेम हा परस्परसंवादी कण प्रणालीच्या अभ्यासातून आला असून यामध्ये कण विशिष्ट नियमानुसार पुढे जातात आणि एकमेकांवर परिणाम करतात. हे आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास एकेरी लेनच्या रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या वाहनांची कल्पना करा, ज्यामध्ये पुढची जागा रिकामी असल्यासच प्रत्येक वाहन पुढे जाऊ शकते. जर रस्त्याच्या एका भागावर वेगमर्यादा थोडी कमी असेल तर त्यामुळे एकूणच वाहतूक प्रवाहाचा वेग कमी होतो का ?
यावर इतर गणितज्ञासमवेत काम करताना बासू यांनी सिद्ध केले की अडथळा अगदी लहान असला तरी त्याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. त्यांचे संशोधन रँडम ग्रोथ मॉडेल्स (Random Growth Models), पर्कोलेशन थिअरी (Percolation Theory) आणि दुर्मिळ घटनांच्या अभ्यासापर्यंत विस्तारलेले आहे; ज्यामध्ये प्रणाली आपल्या नेहमीच्या नमुन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागतात.
बासू यांचा शैक्षणिक प्रवास हा कोलकता येथील इंडियन स्टॅटिस्टकल इन्स्टिट्यूट मधून सुरू झाला. तिथे त्यांनी 2009 मध्ये बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि 2011 मध्ये मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स पदवी पूर्ण केली.
त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 2015 मध्ये ॲलन स्लाय यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॅटिस्टिक्समध्ये पीएचडी पूर्ण केली. भारतात परतण्यापूर्वी त्यांनी पुढील दोन वर्ष स्टॅनफोर्ड विद्यापीठात स्झेगो असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले. नंतर ते टाटाच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल सायन्सेसमध्ये रुजू झाले. सध्या ते ICTS असोसिएट प्रोफेसर असून त्यांचे संशोधन संभाव्यता सिद्धांत आणि सांख्यिकीय भौतिकशास्त्रावर केंद्रित आहे.






