प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दुष्काळात महायुतीच्या सर्व मित्रपक्षांनी खेळखंडोबा केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देऊन त्यांची थट्टा केली आहे. आम्ही कोणालाही मदत करू नये, अशी सरकारची मूलभूत भूमिका आहे,” असा आरोप त्यांनी केला.
विदर्भ आणि मराठवाडा हे देशातील कापूस उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, देशातील ६३ टक्के कापूस या दोन्ही भागांतून येतो. ब्राझीलमध्ये यंदा कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. तेथील प्रक्रिया क्षमतेपेक्षा उत्पादन अधिक असल्याने जागतिक बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी पर्याय शोधण्याची वेळ ब्राझीलवर आली आहे. अशा परिस्थितीत आयात होणाऱ्या कापसावर शुल्क वाढविण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
३१ ऑक्टोबरपर्यंत आयात होणाऱ्या कापसावर आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. मात्र, कापसाला सरकारने हमीभाव जाहीर करूनही सीसीआयने अद्याप हमीभावाने खरेदी सुरू केलेली नाही. आयात होणाऱ्या कापसावर २० टक्के आयात शुल्क लावावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. “३१ डिसेंबरपर्यंत आयात शुल्क १७ टक्के होते. त्यात तीन टक्क्यांनी वाढ करून ते २० टक्के करावे, अशी आमची मागणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्त परिस्थितीत शासनाला शेतकऱ्यांना थेट मदत करता येत नसेल, तर बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करावी. कापड प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून तयार कपड्यांच्या विक्रीवरही नियंत्रण आणले पाहिजे. त्यामुळे बाजारातील दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही सरकारला आव्हान देतो की, यावेळी लक्ष्यकेंद्रित आंदोलन केले जाईल. या आंदोलनाची सुरुवात नागपूरमधून करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप आणि आरएसएसचे सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार असल्याची टीका करताना, राज्य सरकारकडे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल इतका अन्नधान्याचा साठा नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात अन्नधान्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असून, व्यापाऱ्यांकडे मात्र मालाचा साठा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, इंदू मिलच्या संदर्भातील प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करणे टाळले आहे.






