
१०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत
श्रेयस निलेश तांबे याचा पुरस्कारासाठीचा प्रस्ताव संबंधित कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला असून, १३ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रत्नागिरी यांनी तो प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र त्यानंतर तब्बल अनेक महिने उलटूनही पुरस्काराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
पुरस्काराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालकांनी समाजकल्याण विभाग, प्रादेशिक कार्यालय तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा ई-मेल आणि लेखी पत्रव्यवहार केला. परंतु आजपर्यंत कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार असून, त्याबाबतचा विलंब आणि अनिश्चितता ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अवमान करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यालाच न्याय मिळत नसेल, तर इतर विद्यार्थ्यांचे काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी पालक निलेश तांबे यांनी समाजकल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडे निवेदन सादर करून पुरस्काराची सद्यस्थिती जाहीर करणे, प्रस्तावावरील कार्यवाहीची माहिती देणे, संबंधित नोंदी उपलब्ध करून देणे तसेच योजना बंद अथवा स्थगित असल्यास त्यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, “१०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यालाही पुरस्कारासाठी हेलपाटे मारावे लागत असतील, तर ही गुणवंत विद्यार्थ्यांची शोकांतिका आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत.पुरस्कार योजना सुरू आहे की बंद, प्रस्ताव कुठे अडकला आहे आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार, याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.