फोटो सौजन्य - Social Media
कधी कधी आयुष्य आपल्याला अशा मार्गावर नेते, जो आपल्या स्वप्नांपेक्षा वेगळा असतो, पण तीच वाट खरी यशाची ठरते. कर्नाटकच्या ऋतुपर्णा के.एस. हिची कथा हेच दाखवते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवी सुरुवात असते. तिच्या कहाणीमध्ये संघर्ष, धैर्य आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दडलेली आहे. नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्यानंतर ऋतुपर्णाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तुटले. पण ती खचली नाही, उलट स्वतःसाठी नवी दिशा शोधली. वडिलांच्या सल्ल्याने तिने अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अड्यार येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला. तिथे मशीन आणि रोबोटिक्सच्या जगाने तिच्या आतली आवड जागवली.
अभ्यासादरम्यान तिने एका मित्रासोबत मिळून असा “डिटॅचेबल रोबोट” तयार केला, जो सुपारीच्या झाडांवर कीटकनाशक फवारणी आणि फळे तोडण्याचे काम करू शकतो. या अभिनव शोधामुळे ती गोवा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत पोहोचली, जिथे तिने जपान, चीन, रशिया आणि सिंगापूरच्या विद्यार्थ्यांना टक्कर देत विजेतेपद मिळवले.
याच कामगिरीमुळे तिच्यासमोर जागतिक स्तरावरील कंपन्यांचे दरवाजे खुले झाले. आधी इंटर्नशिप आणि मग ऑफर: पहिली ₹39.58 लाखांची, आणि नंतर ₹72.2 लाख वार्षिक पॅकेजची. आणि हे यश तिने फक्त 20 व्या वर्षी मिळवलं!
कठोर मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर ऋतुपर्णाने केवळ तांत्रिक नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. ती दक्षिण कन्नड डीसी फेलोशिपच्या टॉप 15 विद्यार्थ्यांमध्ये निवडली गेली, जिथे तिने स्थानिक समस्यांवर नवे उपाय शोधले. ऋतुपर्णाचे म्हणणे खूप प्रभावी आहे. “स्वप्नं बघणारे खूप असतात, पण त्यासाठी झगडणारे थोडेच. हजार वेळा पडा, पण प्रत्येक वेळी उभे राहा!” तिची कहाणी प्रत्येक तरुणाला हे शिकवते की जिद्द आणि प्रयत्न असेल, तर मार्ग स्वतः तयार होतो. कारण ज्यांना लक्ष्यपर्यंत पोहण्याची ओढ असते, त्यांच्यासाठी अडथळेही पायऱ्या बनतात.