
फोटो सौजन्य - Social Media
नीता परब, मुंबई नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून एकूण १५,९०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४,६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. तसेच ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ६६ विद्यार्थी आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थी :
सिताराम मिल कंपाऊंड एमपीएस महानगरपालिका माध्यमिक शाळेतील स्वयंम शेखर गोरेगावकर या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक डी.एन. नगर एमपीएस माध्यमिक शाळेच्या आशिया जाकीर सय्यद या विद्यार्थिनीने ९६.२० टक्के गुण मिळविले आहेत. तृतीय क्रमांक प्रभादेवी एमपीएस माध्यमिक शाळेचा दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड एमपीएस माध्यमिक शाळेची जिनल हरेश सुमेसरा यांनी संयुक्तपणे पटकावला असून दोघांनाही ९५.८० टक्के गुण मिळाले आहेत. चतुर्थ क्रमांक गुंदवली एमपीएस माध्यमिक शाळेतील प्रिन्स अखिलेश मौर्या याने ९५.२० टक्के गुणांसह मिळविला आहे. तर पाचवा क्रमांक नेहरूनगर एमपीएस माध्यमिक शाळेतील किशन श्रीनंद प्रजापती आणि सहकारनगर एमपीएस माध्यमिक शाळेतील शुभम चंद्रप्रकाश चौधरी यांनी संयुक्तपणे पटकावला असून दोघांनाही ९४.४० टक्के गुण मिळाले आहेत.
मागील वर्षांची निकालाची आकडेवारी :
मागील वर्षांचा निकाल पाहता मार्च २०२२ मध्ये ९७.१० टक्के, मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के, मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के, मार्च २०२५ मध्ये ९२.९२ टक्के, तर मार्च २०२६ मध्ये ९२.०८ टक्के निकाल लागला आहे.
निकालात वाढ होण्यासाठी पालिका प्रशासनाचे विविध उपाय :
माध्यमिक शालांत परीक्षा निकालवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत एसएससी निकालवृद्धीसाठी नियोजन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. महानगरपालिकेने स्वतःची ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिका तयार केली असून तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळविण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना गणित व्यवसाय पुस्तिकाही देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी बोर्डाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेतल्या जातात.
निकालवृद्धीबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. बोर्डाच्या नियमकांची व्याख्यानेही आयोजित केली जातात. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी निकालवृद्धीसाठी सभा घेतल्या जातात. एकंदरीत सरासरी निकाल पाहता विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.