
सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?
याचदरम्यान, राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेवरून बरेच वादळ उठले आहे. सेवारत शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी, अशी अट घालण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणारे निकष, शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता परिपूर्ण नाही काय? असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. परिस्थितीनुसार भरतीचे निकष बदलले असले, तरी पूर्वी सेवेत समाविष्ट झालेल्या शिक्षकांना नवीन निकष कशासाठी, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून अद्ययावत करण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यात १९९० ते २००० च्या दशकात शिक्षणसेवेत समाविष्ट झालेल्या शिक्षकांना संगणकाचे ज्ञान नव्हते.
मात्र, बदलत्या काळानुसार शिक्षकांनी संगणकाचे ज्ञान अवगत करून घेतले आहे. अनेक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. दरम्यानच्या काळात शिक्षण आयुक्तांनी जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न चालविला होता. एवढेच नव्हे तर भामरागडसारख्या आदिवासीबहुल, नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील तालुक्यातील शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न यशस्वीरीत्या काही दिवस राबविण्यात आला. असे असतानाही शासनाने नवीन शिक्षक भरतीसाठी लावलेले निकष यापूर्वी सेवेत दाखल असलेल्या शिक्षकांना का, असाही प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानानुसार अनेक शिक्षक अद्यावत राहण्याचा प्रयत्न करतात. हे खरे असले तरी विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अभ्यास करणे कठीण जाते. विद्यार्थ्यांना नवनवीन कोणते ज्ञान द्यायचे, याची कारणमीमांसा शिक्षक करीत असतात. त्यामुळे शासनाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत आहेत. असे असतानाही नव्याने लावण्यात येणाऱ्या निकषाची पूर्तता करण्याची सक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासह आता शिक्षकांनाही ज्ञानार्जन करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
राज्यात सध्या शिक्षक पात्रता परीक्षेवरून (टीईटी) वादळ उठले आहे. यामुळे राज्यातील काही शिक्षक संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम विद्याच्यर्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होणार असल्याची खंत पालकांकडून व्यक्त केली जात आहे. तत्कालीन काळात शिक्षक भरतीसाठी वापरण्यात आलेले निकष हे सदोष होते काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.