कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार
वर्धा : ज्वेलर्स दुकानारांना नागपूर येथून दागिने बनवण्याची बतावणी करणाऱ्या कारागिराने तब्बल पाच दुकानांतून 129 ग्रॅम वजनाचे 14 लाख 27 हजार किमतीचे सोने घेऊन पोबारा केला. ही घटना हिंगणघाट येथे शुक्रवारी (दि.19) उघडकीस आली. या घटनेने सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अनुप अजितकुमार कोठारी (वय ४१, रा. सराफा लाइन, जैन मंदिर वॉर्ड, हिंगणघाट) यांचे सोन्या-चांदीचे कनक ज्वेलर्स आहे. त्यांच्या दुकानात आरोपी उज्ज्वल गंगादर माल (वय ३९, रा. दत्तापारा गोकुळ पो. जउग्राम पो.स्टे. जमलपूर) हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता. 8 सप्टेंबर रोजी अनुप कोठारी यांनी दुकानातून 55 ग्रॅम सोने नागपूर येथे जाऊन बनवण्यासाठी उज्ज्वल याच्याकडे दिले होते.
हेदेखील वाचा : Washim Crime: श्रीमंत वरांची निवड, पारंपरिक लग्न, आणि मग चोरी; लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधुचा दागिन्यांवर डल्ला टोळी जेरबंद
शुक्रवारी कोठारी यांनी कारागिरला फोन केला असता काम झाले नाही, असे त्याने सांगितले. रविवारी फोन केला असता हिंगणघाट येथे माल घेऊन येतो, असे सांगितले. गुरुवारी (दि.18) इतर ज्वेलर्समधून सोने व्यापाऱ्याने दिले असल्याचे सांगितले. आरोपीने कोठारी यांच्या दुकानातून ५५ ग्रॅम, आदित्य कोठारी यांच्या दुकानातून ३६ ग्रॅम सोने, देवांशिव जाना यांच्या दुकानातून २० ग्रॅम सोने, अरविंद पाल यांच्या ज्वेलर्समधून ५ ग्रॅम सोने, प्रभा पात्रा यांच्या दुकानातून १३ ग्रॅम सोने असे एकूण १२९ ग्रॅम सोने घेऊन आरोपी पसार झाला. हिंगणघाट पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
आरोपीच्या शोधात पोलिस
नागपूर येथून सोने बनवून आणतो, अशी बतावणी करून आरोपी कारागिर उज्वल याने हिंगणघाट येथील पाच ज्वेलर्समधून सोने घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने फोन बंद केल्याने दुकानदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ही घटना उघडकीस आली. दुकानदारांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपीच्या मूळ गावी जाऊन शोध घेत असल्याचे सांगितले.