
कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील रहिवासी आहे. ते बांधकाम ठेकेदार आहेत. समाज माध्यमात त्यांनी ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ ही चित्रफीत पाहिली होती. या चित्रफितीत कौटुंबिक अडचणी, पीडा दूर करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती विधातेने प्रसारित केल्या होत्या. तक्रारदार हे डिसेंबर २०२५ मध्ये तिच्या संपर्कात आले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने मोनाली विधाते हिने हळदी-कुंकू, बाहुली, दोर तक्रारदाराला पाठवून दिला. त्यानंतर तिने तक्रारदाराला बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरातील घरी बोलावले.
कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविले. तक्रारदाराला मृत्यूची भीती दाखविली. पीडा दूर करण्यासाठी उतारा टाकवा लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात ४५ हजार रुपये घेतले. तक्रारदाराला जिवे मारणे, तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.
कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट
नो-पार्किंगमध्ये लावलेले वाहन उचलल्यानंतर वाहनचालकाला ‘दंडा’चा धाक दाखवीत त्याच्याकडून ३ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये उघडकीस आला आहे. टोइंग व्हॅनवरील चालकासह दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कार सोडण्यासाठी १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशी भीती घातली आणि त्यातून तीन हजार रुपये उकळले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने टोइंग व्हॅनवरील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आकाश नवनीत सावंत, समीर अतिक अन्सारी आणि शेख शौकत अतिक अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही शहर वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. याबाबत कोरेगाव पार्क येथील ४६ वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.