
बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
पुणे : बुलडाणा अर्बन को ऑप क्रिडेट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करुन सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलडाणा अर्बन सोसायटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय ४४) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय ५१, रा. बुलढाणा) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
डिसेंबर २०२५ मध्येच काढले कामावरून
पोलिसांच्या माहितीनुसार, शिरीष देशपांडे हे बुलडाणा अर्बन क्रिडेट सोसायटीमध्ये पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापिका होत्या. त्यांनी सोसायटीमध्ये अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात समोर आल्याने दोघांना सोसायटीने डिसेंबर २०२५ मध्ये काढून टाकले होते. त्यानंतर सोसायटीच्या खात्यांचा फॉरेन्सिक अॅडिट केल्यानंतर आता सोसायटीच्या वतीने लेखापाल मोहन दलाल यांनी तक्रार दिली आहे.
शिरीष देशपांडे व योगिनी पोकळे यांनी संस्थेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करुन बुलडाणा को ऑप क्रेडिट सोसायटीच्या बुलडाणा बँकेचे नियमांकडे दुर्लक्ष केले. नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे, स्वत:च्या फायद्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज घेतले. तसेच बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या फायद्यासाठी बिनव्याजी अॅडव्हान्स देणे, ही कंपनी बँकेची सबसिडीयरी कंपनी दाखवणे व या कंपनीकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करुन सदस्यत्व देणे, व नंतर रद्द करणे, छोटे बॅलन्स शीट आर ओ सी साइटवर अपलोड करणे, मंडळाची मान्यता न घेता सोसायटीसाठी मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, मंडळाची परवानगी न घेता कर्ज माफ करणे, कारण मालमत्ता विकून त्याची रक्कम सोसायटीत न जमा करणे, परस्पर कर्जदाराच्या खात्यात रक्कम भरून इतर खात्यात वर्ग करणे, अशा पद्धतीने व्यवहार करून संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.