संग्रहित फोटो
बुलढाणा : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहीत महिलेला आणि तिच्या आईला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचा पती आणि सासरच्या लोकांनीच तिला जीवानिशी मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हमध्ये कैद झाला आहे. केस परत घे नाहीतर जीवानिशी मारेन असे म्हणत मारहाण केली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांत आरोपी पती सागर झगरेसह सासरच्या दोन लोकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती सागरशी वाद होते, त्यांचं एकमेकांशी पटत नसल्याने ती काही दिवसांपासून वेगळी रहात आहे. शिवाय पीडित महिलेने आपल्याला खावटी मिळावी म्हणून पतिविरुद्ध न्यायालयात केस दाखल केली होती. मात्र यामुळे तिचा पती सागर आणि सासरचे लोक खूप संतापले होते. त्याच रागाच्या भरात, चिडलेला आरोपी सागर हा त्याच्या कुटुंबातील काही लोकांसह त्याच्या विभक्त राहणाऱ्या पत्नीकडे गेला. आणि तिला व तिच्या आईल भररस्त्यातच बेदम मारहाण केली.
दरम्यान खावटीची केस परत घे नाहीतर जीवाने मारून टाकेन अशी धमकीही आरोपीने पीडित महिलेला दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. महिलेला व तिच्या आईला अशी अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पुण्यात तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण
दरम्यान गेल्या काही महिन्याखाली प्रेमसंबंघाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सुखसागरनगर परिसरात घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ऋषीकेश दीपक खोपडे (वय २६, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रणव प्रशांत जगताप (वय २५, रा. बिबवेवाडी), सार्थक संतोष भोर (वय २१, रा. धनकवडी), कुमार तुळशीराम भागवत (वय २४), अमर अशोक लोंढे (वय २०, दोघे रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खोपडे याचे तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास खोपडे सुखसागनर परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपी जगताप, भोर, भागवत, लोंढे यांनी खोपडेला अडवले. त्याला लाथाबु्क्क्यांनी, तसेच दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत खोपडे गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. खोपडेला रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक निरीक्षक विकास बाबर अधिक तपास करत आहेत.