संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे दररोज बंद घरे फोडून लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. पुणे शहरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, फुरसूंगी तसेच वानवडीत बंद फ्लॅट फोडत दहा लाखांचा ऐवज लांबविला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत असताना पोलिसांना मात्र, या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे.
पहिल्या घटनेत फुरसूंगीत एका इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅटच्या बेडरुमधील स्लायडींगच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोकड असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी मयुर अग्रवाल यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. मंतरवाडी उरूळी देवाची येथे अग्रवाल हे राहण्यास असून, ते घराला कुलूप लावून गेल्यानतंर चोरट्यांनी घरफोडी केली.
दुसरी घटना घोरपडी येथील सोपानबाग येथील एका सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून चोरट्यांनी ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ७८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ही घटना २१ ते २७ ऑगस्ट या काळात घडली आहे.
साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पै-पै जमवणाऱ्या पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत ‘करोडपती’ होत आहेत. पुणेकर कंगाल होत असताना पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे. शांत शहरासोबतच सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख. पण, गेल्या काही वर्षात गुन्हेगारांनी गालबोट लावले आहे. वाहन चोरी, सोनसाखळी, लुटमार आणि घरफोडी अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सर्व सामान्य पुणेकर हैराण आहेत. काही वेळांसाठीही घर बंद केल्यानंतर कायम तुमच्यावरच नजर ठेवल्याप्रमाणे ते घर फोडले जात आहे. रात्री आणि दिवसा देखील घरफोडीच्या घटना घडत असल्याने पुणेकरांनी घराला कुलूप लावायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.