संग्रहित फोटो
अहिल्यानगर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेता असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पिंकसिटीजवळील परिसरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथील रहिवासी विक्रमसिंह बबनराव कळमकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ३३ वर्षीय महिला असून त्या घरकाम करतात. त्या पारनेर तालुक्यातील रहिवासी आहेत. घटनेच्या वेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेबद्दल कोणाला काही सांगू नये, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. सुरुवातीला हा प्रकार पारनेर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला होता. मात्र घटनास्थळ अहिल्यानगर शहराच्या हद्दीत येत असल्याने झिरो नंबरने गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. एका राजकीय नेत्यावरच असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.






