पुण्यातील निगडीत तरुणावर चाकूने हल्ला; सपासप वार केले अन्...
पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केलाय. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना निगडी येथील चिकन चौक येथे घडली आहे. भरत भागवत म्हस्के (३४, राहुलनगर, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सूरज कोंडिराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल ऊर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रणदिवे, ओव्हाळ व वैरागे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादी भरत हे त्यांच्या मित्रांसोबत चिकन चौकात गप्पा मारत थांबले होते. दरम्यान, भरत यांचे हृतिक याच्यासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी भरत यांच्यावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बांबू आणि हातानेही मारहाण करून गंभीर जखमी केले.
हे सुद्धा वाचा : एटीएममधून पैसे काढून देतो म्हणून एकाची फसवणूक; खात्यातील रोकड चोरली
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
बुधवार पेठेत एकाच्या खुनाचा प्रयत्न
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील बुधवार पेठेत किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात वीट मारुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. हुतात्मा चौकात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना पकडले आहे. याप्रकरणी विनोद अप्पाराव माने (वय ३५, रा. गुरुजी तालीम गणपती मंदिराजवळ, बुधवार पेठ), चिराग भजनलाल निमगावकर (वय ३५, रा. शोनान सोसायटी, नवी पेठ) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत किशोर चंद्रकात काळेबेरे (वय ५८, रा. लक्ष्मी रस्ता, गणेश पेठ) गंभीर जखमी झाले आहेत.