ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये वाढ; गेल्या वर्षभरात तब्बल 'इतक्या' जणांवर कारवाई
मुंबई : मद्यपान करुन गाडी चालविणे हा गुन्हा असला तरी मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमधूनच हिट अँड रन सारख्या घटना घडतात. अशा मद्यपान करुन गाडी चालविणाऱ्या चालकांची झिंग उतविण्याचा सपाटा मुंबई वाहतूक पोलिसांनी लावला आहे. गेल्या वर्षी ९ हजार ४८० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईत वाहनांची संख्या ज्या झपाट्याने वाढते आहे. त्याच तुलनेत शहरात मद्यपान करुन गाडी चालविण्याच्या घटना वाढल्या आहेत.
मुंबईत सध्याच्या घडीला ४९ लाखांपेक्षा जास्त वाहने रजिस्टर आहेत. बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढते आहे. मद्यपान करुन वाहन चालविल्याबद्दल चालकांला पहिल्या गुन्ह्यांबद्दल ६ महिने तरुंगवास किंवा २ हजार रुपयांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपयांचा दंड आणि २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते.
वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ तरुणांमध्ये आहे. त्यातच मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. पुण्यातील अपघात प्रकरण चर्चेत आहे. अल्पवयीन मुले-मुली ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यांमध्ये अडकू नयेत यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियमात बदल केला आहे. आता अल्पवयीन वाहन चालविताना गुन्हा घडला तर २५ हजार रुपयांचा दंड आणि पालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
१) पुण्यातील पोर्शे, वरळीतील बीएमडब्ल्यू अपघात प्रकरणानंतर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करत ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे.
2) मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी * चालविण्याची एक प्रकारची नशा सध्या तरुणाईमध्ये वाढली आहे. रात्री, मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी मद्यपान करुन वेगाने गाडी चालविण्यात येते. अशा चालकांमुळे स्वतासह दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात घातला जातो.
3) बार, पबची तपासणी करत शहरात सर्वत्र गस्त घालण्यात येते. पवई, दादरमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी यापूर्वी कारवाईही केली आहे.