दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; आई अन् भावावर कोयत्याने सपासप वार
पुणे : पुण्यातून एक मोठी बतमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने आई व भावावर कोयत्याने वार केल्याची घटना सेनापती बापट रस्ता येथील रामोशीवाडीत घडली आहे. याप्रकरणी गणेश अरुण जाधव (वय २८, रा. रामोशीवाडी, रत्ना हॉस्पिटलमागे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत गणेश याचा मोठा भाऊ दिगंबर (वय ३५) यांनी चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. गणेश याने केलेल्या हल्ल्यात दिगंबर आणि त्यांची आई जखमी झाले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेशला दारूचे व्यसन आहे. शनिवारी (२५ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास गणेश घरी आला. त्याने आईकडे दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडला. त्याने आईला शिवीगाळ केली, तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोठा भाऊ दिगंबर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गणेशने घरात लाकडे फोडण्यासाठी ठेवलेला कोयता उचलला आणि भाऊ दिगंबर यांच्यावर हल्ला केला. दिगंबर यांच्या डोक्यात कोयता मारला.
दरम्यान आईने मध्यस्थी केली. गणेशने आईच्या डोक्यात कोयत्याने वार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात दिगंबर आणि त्यांची आई जखमी झाली. जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई आणि भावाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी गणेश याला अटक करण्यात आली. सहायक निरीक्षक गणेश धामणे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांचे ‘COP-24’ कात टाकणार! 700 कर्मचारी शहरभर पेट्रोलिंग करणार
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरार झालेल्या गुंडाला पकडले